लोहारा ( जि. धाराशिव) : ग्रामीण आरोग्यसेवेतील नवकल्पना व सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे स्पर्श ग्रामीण रुग्णालय, सास्तूरने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘कायाकल्प’ आणि ‘इको-फ्रेंडली हॉस्पिटल’ उपक्रमांत राज्यभरातून पहिला क्रमांक पटकावत या रुग्णालयाने ग्रामीण आरोग्यसेवेसाठी एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
१२ जून रोजी जाहीर झालेल्या निकालात, कायाकल्पमध्ये ९९.८६% गुण व इको-फ्रेंडली श्रेणीत ९२.५२% गुण मिळवत स्पर्शने अनुक्रमे १५ लाख व ५ लाखांचे प्रथम पारितोषिक मिळवले. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हे गौरवप्राप्त पुरस्कार आरोग्य विभागामार्फत दिले जातात.
या यशामागे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांचे मार्गदर्शन तसेच श्री. रमाकांत जोशी व त्यांच्या टीमचे सातत्यपूर्ण योगदान आहे. मागील दोन वेळा द्वितीय क्रमांक मिळवलेल्या स्पर्शने यावर्षी प्रथम क्रमांक मिळवत आपल्या दर्जेदार सेवा आणि नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे.
‘कायाकल्प’ उपक्रमांतर्गत रुग्णालयातील स्वच्छता, संसर्ग प्रतिबंध, जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, रुग्णांना दिली जाणारी सेवा, सन्मानजनक वागणूक, व कर्मचार्यांचे प्रशिक्षण यावर मूल्यांकन होते. ‘इको-फ्रेंडली’मध्ये सौरऊर्जा वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, प्लास्टिक विरोध, वनीकरण व ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर यावर भर दिला जातो.
स्पर्श रुग्णालयाच्या कामगिरीचा गौरव करण्याजोगा पैलू म्हणजे, मागील वर्षभरात ४ जिल्ह्यांतील ४५१ गावांमधून रुग्ण सेवा घेण्यासाठी आले. सुरक्षित बाळंतपणे, लहान बालकांसाठी आयसीयू सुविधा, शस्त्रक्रिया, रुग्णांशी संवाद व १२४ गावांत आरोग्य शिक्षण यामुळे ग्रामीण भागातही विश्वासार्हतेचा उच्चांक गाठण्यात आला आहे.
या रुग्णालयाने पूर्वीही डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार (३ वेळा), माता-बाल संगोपनासाठी अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, NQAS, ISO, LaQshya मानांकन यांसारख्या अनेक राष्ट्रीय-राज्यस्तरीय पुरस्कारांची कमाई केली आहे. मागील महिन्यात ‘राज्यात सर्वाधिक प्रसूती’ विभागात दुसरा क्रमांकही मिळवण्यात आला.
या यशाबद्दल संपूर्ण आरोग्य क्षेत्रातून स्पर्श रुग्णालयाचे अभिनंदन होत आहे. “या गौरवामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. दर्जेदार आणि माणुसकीने भरलेली सेवा हेच आमचे ध्येय राहील,” असे भावनिक उद्गार श्री. रमाकांत जोशी यांनी काढले.