१२ जानेवारी १५९८ हा महाराष्ट्राच्या आणि भारतीय इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला दिवस आहे. या दिवशी जन्म झाला तो स्वराज्याच्या संकल्पनेला जन्म देणाऱ्या, राष्ट्रनिष्ठा, शौर्य, संस्कार आणि त्यागाचे मूर्तिमंत रूप असलेल्या राजमाता जिजाऊ यांचा.
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान योद्ध्याला घडविणाऱ्या या थोर मातेला इतिहासात स्वराज्याची जननी म्हणून मानाचा मुजरा केला जातो.
राजमाता जिजाऊ यांचा जन्म सिंदखेड राजा (जिल्हा बुलढाणा) येथे झाला. त्या सिंदखेडचे सरदार लखुजी जाधवराव यांच्या कन्या होत.
बालपणापासूनच त्यांच्यावर शौर्य, स्वाभिमान, धर्मनिष्ठा आणि न्यायाची शिकवण झाली. त्या काळातील राजकीय परिस्थिती, अन्याय, परकीय सत्तेचे अत्याचार हे सर्व त्यांनी जवळून पाहिले. या अनुभवांनी त्यांच्या मनात स्वराज्याची ठाम भावना रुजली.
मातृत्वातून राष्ट्रघडण
राजमाता जिजाऊ या केवळ शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या त्यांच्या पहिल्या गुरू होत्या.
बाल शिवबाच्या मनावर त्यांनी रामायण, महाभारत, धर्म, नीती, पराक्रम, सत्य आणि न्याय यांचे संस्कार घडवले. शिवाजी महाराजांच्या बालमनात स्वराज्य ही संकल्पना रुजवण्याचे महान कार्य जिजाऊ मातांनी केले.
“अन्यायाविरुद्ध उभे राहणे हेच खरे धर्मकार्य आहे” ही शिकवण त्यांनी शिवरायांना दिली. त्यामुळेच शिवाजी महाराज केवळ पराक्रमी राजा नव्हे, तर प्रजाहितदक्ष, न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राजा घडले.
संघर्षातही धैर्य
आयुष्यात अनेक दुःख, संकटे आणि संघर्ष येऊनही राजमाता जिजाऊ कधीही खचल्या नाहीत.
पती शहाजी महाराजांचे दीर्घकाळ दूर असणे, राजकीय डावपेच, सततचे युद्धाचे वातावरण—या सर्व परिस्थितीत त्यांनी संयम, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा जपली. स्वतःच्या वेदनांपेक्षा राष्ट्रहित आणि पुत्राचे कर्तव्य यांना त्यांनी नेहमी प्राधान्य दिले.
आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श
आजच्या काळात राजमाता जिजाऊ यांचे जीवन तरुण पिढीसाठी दीपस्तंभ आहे.
त्याग, धैर्य, शिस्त, स्वाभिमान, राष्ट्रप्रेम आणि नैतिक मूल्ये यांचा संगम म्हणजे जिजाऊ माता.
मुलगा असो वा मुलगी—संस्कार, शिक्षण आणि मूल्याधिष्ठित विचार दिल्यास कोणतेही मूल देशासाठी महान कार्य करू शकते, हा संदेश त्यांच्या जीवनातून मिळतो.
राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिन साजरा करणे म्हणजे केवळ इतिहासाची उजळणी नव्हे, तर स्वतःच्या जीवनात त्यांचे आदर्श आचरणात आणण्याचा संकल्प होय. त्यांच्या विचारांवर चालणारी तरुण पिढीच खऱ्या अर्थाने सक्षम, सशक्त आणि स्वाभिमानी भारत घडवू शकते.

✍️ लेखिका :
शिक्षिका श्रीमती चौधरी वर्षा कमलाकर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मार्डी
तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव
Back to top button
error: Content is protected !!