शैक्षणिकधाराशिव

न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

लोहारा : न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल, लोहारा येथे 21 फेब्रुवारी रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या सोहळ्याने श्री व सौ. जाधव दांपत्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची साक्ष दिली. नावाप्रमाणेच नव्या ध्येयाने शिक्षणक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी ही शाळा गेल्या 13 वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान व सुसंस्कारांची पेरणी करत आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास भोसले होते. उद्घाटक म्हणून स.पो.नि. श्री विजय पवार, सास्तुरच्या सरपंच सौ. शीतलताई राहुल पाटील, नूतन पंचायत समिती सभापती श्री विजय ढगे, लोहारा नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. आरती कोरे, तसेच संस्थेचे संचालक श्री महावीर जाधव, प्राचार्य श्री शहाजी जाधव, पालक प्रतिनिधी श्री रमेश वाघुले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यानंतर मान्यवरांचा सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेतील नर्सरी ते सातवीतील विद्यार्थ्यांना “बेस्ट स्टुडंट” पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच मेस्टा संघटनेतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक श्री सिद्धेश्वर सुरवसे यांना देण्यात आला.

शाळेचा वार्षिक अहवाल श्री रमेश गिराम यांनी सादर केला. मार्गदर्शन करताना स.पो.नि. विजय पवार यांनी पालकांनी आपल्या पाल्यांना वेळ देणे व शिक्षकांसोबत मिळून चांगली संतती घडवण्यावर भर देण्याचे आवाहन केले.

यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीपर गीत, कोळी नृत्य, शेतकरी गीत, बाळगीत, लावणी, राजस्थानी नृत्य, गोंधळगीत तसेच मराठी व हिंदी चित्रपट गीतांवरील नृत्य सादरीकरणाने रंगत वाढवली. “थकलेल्या बाबांची कहाणी” या गीताने उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले, तर मोबाईलच्या दुष्परिणामांवरील सादरीकरणाने समाजप्रबोधन केले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानावर आधारित नाटिकेने शौर्य व पराक्रमाचा जागर केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिस साक्षी कुंभार व सोनाली काटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सविता जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

या स्नेहसंमेलनास शिक्षणप्रेमी, कलाप्रेमी नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!