लोहारा, ( जि. धाराशिव ) 12 जून 2025 — लोहारा नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पातील कथित गैरव्यवहार आणि पर्यावरणीय धोक्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तालुका प्रमुख अमोल दत्तात्रय बिराजदार यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन चौकशी समितीच्या कार्यवाहीसंदर्भात माहितीची मागणी केली.
लोहाऱ्यातील धान्य पुरवठा गोडाऊन आणि घनकचरा प्रकल्प शून्य अंतरावर असल्याने भविष्यात गंभीर आरोग्य व पर्यावरणीय परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमोल बिराजदार यांनी 19 ते 22 मे दरम्यान उपोषण आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
या प्रकल्पात निधीच्या गैरवापरासोबतच टेंडर प्रक्रियेत अपारदर्शकता, घनकचरा व्यवस्थापनातील त्रुटी, आणि आवश्यक शासकीय परवानग्यांचा अभाव आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, मच्छरांचा उपद्रव आणि रोगप्रदूषण वाढल्याची तक्रार आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार प्रवीण स्वामी यांनी याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित चौकशीचे आदेश देण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कीर्ती पुजारी यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी चौकशी समिती गठित करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गुरुवारी, 12 जून रोजी अमोल बिराजदार यांनी संबंधित प्रकल्पातील कागदपत्रे, आर्थिक अनियमिततेचे पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले. तसेच चौकशी समितीमध्ये कोणते सदस्य आहेत, त्यांनी कोणती कार्यवाही केली, अहवाल तयार झाला का, याची माहिती देत अहवाल तत्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्रही सादर करण्यात आले आहे.
अमोल बिराजदार यांनी स्पष्ट मागणी केली आहे की, “या प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घनकचरा प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा.”
या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक प्रशांत काळे, युवासेना शहरप्रमुख प्रेम लांडगे आणि आकाश विरोधे उपस्थित होते.