लोहारा (प्रतिनिधी) : लोहारा (खुर्द), खेड येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळपास कस घातलेल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति मे. टन ₹२७०० तर उशीरा गाळपास झालेल्या ऊसासाठी ₹२८०० दराने १००% ऊस बिले अदा केल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली आहे.
सदर हंगामात एकूण २,१८,२८६.०२८ मे. टन ऊसाचे गाळप करण्यात आले असून, त्याची एफ.आर.पी (FRP) प्रति मे. टन ₹२३४३.५९ इतकी होती. मात्र कारखान्याने अधिक दर देत एकूण ₹६० कोटी ९८ लाख २४ हजार रूपये ऊस बील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट वर्ग केले.
एफ.आर.पीनुसार बीलाची एकूण रक्कम ₹५१ कोटी १५ लाख ७२ हजार इतकी असताना, त्यावर ₹९ कोटी ८२ लाख ५१ हजार ६७९ इतकी जादा रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली गेली आहे. म्हणजेच प्रति मे. टन ₹५०० जादा दराने बील अदा करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असून, “लोकमंगलवर दाखवलेल्या विश्वासाला न्याय मिळाला,” अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
कारखान्याच्या शेती विभागाकडून पुढील गळीत हंगामासाठी अद्याप नोंद न झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.