
धाराशिव | प्रतिनिधी
खरीप 2024 मध्ये पीक काढणी कव्हर (पोस्ट हार्वेस्टिंग) अंतर्गत नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या धाराशिव जिल्ह्यातील सुमारे 75 हजार शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नेते अनिल जगताप यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय समितीची तातडीने बैठक घेऊन संबंधित विमा कंपनीला आदेश द्यावेत, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे.
596 कोटींचा विमा हप्ता, परंतु अद्यापही मोठा वर्ग वंचित
खरीप हंगाम 2024 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 7 लाख 19 हजार 167 शेतकऱ्यांनी एचडीएफसी पिक विमा कंपनीकडे विमा भरला होता. केंद्र, राज्य व शेतकरी अशा तीनही घटकांकडून मिळून एकूण 596 कोटी 95 लाख रुपयांचा विमा हप्ता कंपनीला देण्यात आला आहे. यामध्ये राज्य शासनाचा हिस्सा अद्याप पूर्णतः दिला गेलेला नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान
गेल्या वर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 72 तासांच्या आत रीतसर पूर्वसूचना दिलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करून 5 लाख 19 हजार 747 शेतकऱ्यांना सुमारे 218 कोटी 8 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. याशिवाय, 7,699 शेतकऱ्यांची भरपाई रक्कम 1,000 रुपयांपेक्षा कमी असल्याने ती राज्य सरकारकडून सबसिडी स्वरूपात दिल्यानंतर वितरित केली जाणार आहे.
पोस्ट हार्वेस्टिंगअंतर्गत 12 कोटींची भरपाई रखडली
पण पीक काढणी कव्हर (Post-Harvesting) अंतर्गत अजूनही 75 हजार शेतकऱ्यांना सुमारे 12 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळालेली नाही. केंद्र सरकारच्या 30 एप्रिल 2024 च्या परिपत्रकानुसार, 100 रुपयांच्या नुकसानावर फक्त 25 रुपयेच भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नव्या सूत्रांमुळे जिल्ह्यातील सुमारे 45 हजार शेतकऱ्यांना भरपाई अजूनही मिळालेली नाही, तर 30 हजार शेतकऱ्यांची पूर्वसूचनेवर आधारित नुकसान भरपाईही रखडलेली आहे.
720 कोटींच्या नुकसानीवर केवळ 231 कोटींचीच भरपाई
अनिल जगताप यांनी यासंदर्भात स्पष्ट केले की, 30 एप्रिलच्या परिपत्रकामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान 720 कोटी रुपये असून त्यातील केवळ 231 कोटी रुपयेच भरपाई म्हणून देण्यात येणार आहेत. हे परिपत्रक नसते, तर शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई मिळाली असती.
तालुकानिहाय भरपाई वितरण
तालुकानिहाय वाटपाचा आढावा घेतल्यास पुढीलप्रमाणे रक्कम वितरित करण्यात आली आहे.
-
भूम – 17 कोटी 1 लाख
-
धाराशिव – 50 कोटी 55 लाख
-
कळंब – 36 कोटी 28 लाख
-
लोहारा – 17 कोटी
-
परंडा – 8 कोटी 56 लाख
-
तुळजापूर – 45 कोटी 59 लाख
-
उमरगा – 25 कोटी 96 लाख
-
वाशी – 17 कोटी 72 लाख
एकूण भरपाई 218 कोटी 8 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
शेतकरी नेते अनिल जगताप यांची भूमिका
“राज्य शासनाने दुसऱ्या हप्त्याचे पैसे विमा कंपनीला दिले असल्याची माहिती वर्तमानपत्रांतून समोर येत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची थकलेली नुकसान भरपाई तत्काळ वितरित करण्यात यावी. खरीप पेरण्यांचा काळ सुरु झालेला असताना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे अत्यंत आवश्यक आहे,” असे अनिल जगताप यांनी स्पष्ट केले आहे.