करजखेडा (ता. धाराशिव) येथील ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीपैकी तब्बल ४ लाख २० हजार रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकाविरुद्ध बुुधवारी (ता. २५) बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जून २०२२ ते १६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत करजखेडा ग्रामपंचायतीला गावातील मूलभूत सुविधा व विकासकामांसाठी १५ व्या वित्त आयोगातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला होता. या निधीतून गावात पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता व इतर अत्यावश्यक कामे अपेक्षित होती.
मात्र प्रत्यक्षात अनेक कामे कागदावरच दाखवून निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात माजी सरपंच सुभाष महादेव कळसुले (रा. करजखेडा) व तत्कालीन ग्रामसेवक एम. आर. सावंत (रा. टाकळी, ता. धाराशिव) यांनी संगनमत करून कोणतीही ठोस विकासकामे न करता मोठी रक्कम परस्पर वळविल्याची तक्रार ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती. ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले.
धाराशिव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. समितीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी, नोंदींची पडताळणी व कागदपत्रांची छाननी केली असता संबंधितांनी दाखविलेली कामे प्रत्यक्षात झालेली नसल्याचे आढळून आले. अहवालात निधीचा अपहार झाल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले. या अहवालाच्या आधारे विस्तार अधिकारी संजय ढाकणे यांनी बेंबळी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार बुधवारी (ता. २५) दोघांविरुद्ध शासकीय निधीचा अपहार व संगनमताने गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, गावाच्या विकासासाठी मिळालेल्या निधीचा अशा प्रकारे अपहार झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
विकासाच्या नावाखाली निधी हडप करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पंचायत राज व्यवस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी दोषींना कडक शिक्षा होणे आवश्यक असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.