लोहारा (जि. धाराशिव) : लोहारा तालुक्यातील भातागळी येथील दत्तात्रय वाघमारे यांची जीवनकहाणी म्हणजे संघर्ष, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाचा प्रेरणादायी प्रवास आहे. शेतमजूर आई-वडिलांच्या कष्टावर वाढलेला हा मुलगा आज लोहारा पंचायत समितीच्या सभापतीपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत असल्याने तालुक्याच्या राजकारणात त्यांची चर्चा केंद्रस्थानी आहे.
३ जानेवारी १९६३ रोजी जन्मलेल्या वाघमारे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. इयत्ता दहावीनंतर मुरुड येथील शासकीय अध्यापक विद्यालयात डी.एड.साठी नंबर लागला; मात्र केवळ ३१ रुपयांची प्रवेश फी नसल्याने शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिले. मुरुड ते भातागळी हा प्रवास त्यांनी निराश मनाने पायी केला. आई शेतमजुरी, तिखट वाटणे, दळण दळणे, भांडी घासणे अशी कामे करायची, तर वडील वर्षाला अवघ्या ५०० रुपयांवर गुरे राखण्याचे सालगडी म्हणून राबत होते.
उदरनिर्वाहासाठी धाराशिव येथील प्रभा बिअर बारमध्ये १२५ रुपये मासिक पगारावर काम करत असतानाच २० नोव्हेंबर १९८५ रोजी जिल्हा परिषद धाराशिव येथे शिपाई पदावर त्यांची नियुक्ती झाली. प्रामाणिकपणा, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर त्यांनी हवालदार, कनिष्ठ सहाय्यक व वरिष्ठ सहाय्यक अशी पदोन्नती मिळवली.
शासकीय सेवेत असताना त्यांनी कधीही कामचुकारपणा केला नाही. तब्बल ६५ वर्षांच्या आयुष्यात एकही दिवस आजारी न पडल्याने त्यांनी ७२० दिवसांची रजा शासनाला बहाल केली. कोरोना काळात आरोग्य सेवेत कार्यरत असलेला मुलगा बाधित झाला असतानाही, वाहन नसल्यामुळे भातागळी–लोहारा असा २४ किलोमीटरचा प्रवास त्यांनी ११ वेळा पायी करत वेळेवर कर्तव्य बजावले.
सेवेबरोबरच डॉ. लक्ष्मणजी आसबे यांच्या कामधेनु सेवा परिवार या संस्थेमार्फत ते सातत्याने सामाजिक कार्यात सहभागी आहेत. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत भातागळी पंचायत समिती गणातून भाजपाचे उमेदवार म्हणून त्यांनी विजय मिळवला आहे.
संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व, स्वच्छ प्रतिमा आणि सर्वसामान्यांशी असलेली नाळ यामुळे दत्तात्रय वाघमारे हे लोहारा पंचायत समिती सभापतीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असून, “सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी राजकारण” ही त्यांची भूमिका तालुक्यात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.