धाराशिव

लोहारा नगरीत महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी

१५ ते १९ फेब्रुवारीदरम्यान पाच दिवस धार्मिक-सांस्कृतिक पर्व

लोहारा (विक्रांत संगशेट्टी) : शहरात महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी आयोजित होणारा भव्य यात्रा महोत्सव यंदा २६ व्या वर्षात पदार्पण करत असून, दि. १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत पाच दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा व कलात्मक कार्यक्रमांनी लोहारा नगरी भक्तीमय व उत्सवमय होणार आहे. या महोत्सवासाठी यात्रा समिती व ग्रामस्थांच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.

महोत्सवाची सुरुवात रविवारी (दि. १५) महाशिवरात्रीच्या दिवशी होणार असून, सकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शोभायात्रेचे आगमन झाल्यानंतर महादेवाची आरती होईल. त्यानंतर शोभायात्रा जुन्या गावातील प्राचीन महादेव मंदिरापर्यंत मार्गस्थ होणार आहे.

दुपारी १२ वाजता भारुडाचा कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी दीपोत्सव, तसेच याच दिवशी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सोमवारी (दि. १६) सकाळी ११.३० वाजता भुजंग महाराज पळसकर यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर महाप्रसाद दिला जाणार आहे.

दुपारी ४ वाजता भव्य खुल्या जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. अंतिम कुस्तीतील विजेत्या मल्लास शिवशंकर जट्टे कुटुंबियांच्या वतीने चांदीची महादेवाची पिंड, तर उपविजेत्यास लोहारा खुर्द येथील संजय रसाळ यांच्या वतीने ५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.

मंगळवारी (दि. १७) सकाळी ७ वाजता मॅरेथॉन स्पर्धा, तर सायंकाळी ४ वाजता भारतमाता मंदिराच्या पाठीमागील हायस्कूल लोहारा मैदानावर सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

बुधवारी (दि. १८) सकाळी १० वाजता श्री बसवेश्वर मंदिर येथे महिलांसाठी खुल्या रांगोळी स्पर्धा, तसेच व्यंगचित्र व छायाचित्र प्रदर्शन होणार आहे. रात्री ७ वाजता भव्य जंगी जुगलबंदी (भारुड) सादर करण्यात येणार आहे.

महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी गुरुवारी (दि. १९) सायंकाळी ७ वाजता हायस्कूल लोहारा मैदानावर भव्य खुल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा पार पडणार आहे.

या पाचदिवसीय महाशिवरात्री यात्रा महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्त, नागरिक व युवकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!