लोहारा | प्रतिनिधी
शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या आणि महायुती शिवसेनेच्या उमेदवार अॅड. आकांक्षाताई चौगुले यांनी उमरगा तालुक्यातील केसरजवळगा पंचायत समिती गणातून विक्रमी मतांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय मैदानात प्रभावी एन्ट्री केली आहे. या विजयाने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
विजयानंतर महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उमरगा शहरातील त्यांच्या निवासस्थानी भेट देत ॲड. आकांक्षाताई चौगुले यांचा सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव केला.
लोहारा शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सत्कार केला. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी,माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला,ओम कोरे मिलाप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दादाभाई मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
जनतेच्या विश्वासावर आणि विकासाच्या स्पष्ट भूमिकेवर हा विजय मिळाल्याचे सांगत अॅड. आकांक्षाताई चौगुले यांनी मतदारांचे आभार मानले. केसरजवळगा गणाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. या निकालामुळे उमरगा तालुक्यात महायुतीची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.