लोहारा : भातागळी (ता. लोहारा) येथे शंभू महादेव यात्रेनिमित्त शिवसेना, युवासेना व समस्त भातागळी ग्रामस्थांच्या वतीने भव्य अशा मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून यंदा शर्यतीसाठी मराठवाड्यातील एकूण ६० बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला होता. पंचक्रोशीतून तसेच संपूर्ण मराठवाड्यातून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे उद्घाटन मराठवाडा युवासेना निरीक्षक मा. किरण भैया गायकवाड, डीवायएसपी शेलार साहेब, लोहारा पोलीस निरीक्षक कोकलारे साहेब, युवासेना नेते शुभम चौगुले, शिवसेना तालुकाध्यक्ष जगन्नाथ पाटील, नगराध्यक्ष वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर, उप तालुकाप्रमुख परवेज तांबोळी तसेच गावातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
या स्पर्धेत एकूण २० फेऱ्या झाल्या असून अंतिम फेरीत ७ गाड्यांनी सहभाग घेतला. अंतिम लढत अत्यंत चुरशीची झाली. दोन गाड्यांनी एकाच वेळी अंतिम रेषा ओलांडल्याने अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेच्या नियमानुसार प्रथम व द्वितीय बक्षीस विभागून देण्यात आले.
जय बादशाह ग्रुप, बामणी (सर्जा-राजा जोडी) व रिया जयेश पाटील, मुंबई – जोकर फॅन्स क्लब (जोकर-बिदाल जोडी) यांनी हे बक्षीस पटकावले.
दादा संजय पाटील (भातागळी) यांच्या लक्ष्या व बादशाह जोडीनेही सुरेख कामगिरी करत पाचवे बक्षीस मिळवले.
प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक तोळा सोने व सन्मानचिन्ह हे किरण भैया गायकवाड यांच्यातर्फे तर द्वितीय क्रमांकाचे ₹५१,००० चे बक्षीस गणी साहेब शेख यांच्यातर्फे देण्यात आले. एकूण सात बक्षिसांचे वितरण विविध प्रायोजकांतर्फे करण्यात आले.
बैल व शेतकरी यांच्या नात्यातील घट्ट वीण या स्पर्धेमुळे पुन्हा दृढ झाल्याचे चित्र होते. ग्रामीण भागातील जातिवंत व खिलार बैलांच्या संवर्धनाला या स्पर्धेमुळे चालना मिळाली आहे.
ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवसेना युवासेना भातागळी व समस्त ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले.
स्पर्धेचे मुख्य आयोजक दादा संजय पाटील, अभिजीत पाटील, हरिप्रसाद पाटील, ऋषिकेश जगताप तसेच सेना कार्यकर्ते जितेंद्र कदम, कृष्णा पाटील, सौरभ जगताप यांनी संपूर्ण नियोजन यशस्वीपणे पार पाडले.
निकाली पंच म्हणून धनवडे बापू, सातारा आणि झेंडा पंच म्हणून जगदाळे बापू, मान खटाव यांनी जबाबदारी सांभाळली.