जळकोट ता.तुळजापूर :- ( प्रतिनिधी संजय रेणुके )
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे विविध विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी उल्लेखनीय कार्य होत असते. त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव शासनाकडून सन २००५ यावर्षीपासून प्रत्येक वर्षी करण्यात येतो. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते.
त्याचाच एक भाग म्हणून सन 2022 – 23 या कालावधीत उत्कृष्ट सेवा बजावलेल्या विविध खात्यातील विभागनिहाय एकूण 35 अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड शासनातर्फे करण्यात आली असल्याचे दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयात करण्यात आले आहे.
उपरोक्त 35 गुणवंतांमध्ये लोहारा तालुक्यातील हराळी येथील मूळ रहिवासी मात्र सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र वाडेबोल्हाई ता. हवेली जि. पुणे येथे कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेले उमाकांत सुरेश सुर्यवंशी यांची पुणे विभागातून उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली असून सर्व एकूण 35 गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याचे सदर शासन निर्णय निर्णयात नमूद करण्यात आले आहे. तसेच निवड झालेल्या गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकात संबंधित विभाग प्रमुखांनी किंवा कार्यालय प्रमुखांनी ” प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला ” अशी नोंद घेऊन संबंधितांना कळवावे असेही नमूद केले आहे. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने काढण्यात आला असून महाराष्ट्र शासनाचे कक्षअधिकारी दिपक राजेंद्र गायकवाड यांच्या डिजिटल स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आला आहे.
उमाकांत सूर्यवंशी यांनी आपल्या सेवाकाळात अनेक भरीव कार्ये केलेली असून त्यांनी केलेल्या कार्यामध्ये प्रलंबित कार्ये तात्काळ मार्गी लावली आहेत. काही कामामुळे शासनाची आर्थिक बचत झालेली आहे. तर कित्येक कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना काळातील अशक्य असणारे कार्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने लिलया पार पाडले आहे. तसेच उमाकांत सूर्यवंशी हे जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्याचे कोषाध्यक्ष या पदावर कार्यरत असून कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून विशेष भरीव कार्ये त्यांनी केली आहेत. त्यामुळे हिंदी मे एक कहावत है, ” हिरे की परक जोहरी ही जाने ” या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन निवड समितीने उमाकांत सूर्यवंशी या हिऱ्याचा शासनातर्फे यथायोग्य सत्कार करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे उमाकांत सूर्यवंशी यांचे कार्यालयीन सहकारी, वरिष्ठ अधिकारी, मित्रपरिवार, नातेवाईक आदींकडून अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे. भावि कालावधीत यापेक्षा भरीव कार्य त्यांच्या कर्मातून घडावे यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.