१२ जानेवारी १८६३ हा भारतीय इतिहासातील सुवर्णदिन. या दिवशी कोलकाता येथे जन्म झाला तो भारताला नवचैतन्य देणाऱ्या, आत्मविश्वास जागवणाऱ्या आणि जगाला भारताची अध्यात्मिक ओळख करून देणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा.
त्यांच्या जन्मदिनी देशभर राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो, ही बाबच त्यांच्या विचारांची आजही असलेली जिवंतता दर्शवते.
स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेन्द्रनाथ दत्त. लहानपणापासूनच बुद्धिमत्ता, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि सत्याचा शोध ही त्यांची वैशिष्ट्ये होती. वडील विश्वनाथ दत्त हे प्रख्यात वकील तर आई भुवनेश्वरी देवी धार्मिक, संस्कारशील व धैर्यशील होत्या. आईकडून त्यांना श्रद्धा तर वडिलांकडून तार्किक विचारांची देणगी मिळाली.
गुरुभक्ती आणि जीवनाचा वळणबिंदू
गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या सान्निध्यात नरेन्द्रनाथ यांच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त झाला. “ईश्वरसेवा म्हणजे मानवसेवा” हा मंत्र त्यांनी आत्मसात केला. संन्यास स्वीकारल्यानंतर ते स्वामी विवेकानंद म्हणून ओळखले जाऊ लागले.
शिकागोतील गर्जना
१८९३ साली शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंदांनी दिलेले ऐतिहासिक भाषण आजही जगाला प्रेरणा देते.
“माझ्या अमेरिकन बंधू-भगिनींनो…” या शब्दांनी त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली आणि भारताच्या सहिष्णुता, करुणा व आध्यात्मिक परंपरेचा डंका जगभर वाजवला.
युवकांसाठी प्रेरणास्त्रोत
“उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका”,
“तुम्हीच तुमच्या नशिबाचे शिल्पकार आहात”
अशा ओजस्वी विचारांनी स्वामी विवेकानंदांनी युवकांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि राष्ट्रभक्ती जागवली.
बलवान शरीर, निर्भय मन आणि निर्मळ चारित्र्य हे त्यांच्या शिक्षणाचे त्रिसूत्र होते.
राष्ट्रउभारणीचे स्वप्न
स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना करून शिक्षण, सेवा व समाजसुधारणेचा वसा पुढे नेला. गरीब, दुर्बल, उपेक्षित समाज घटकांच्या उत्थानासाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यांच्यासाठी धर्म म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर दुःखी माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसणे होते.
आजच्या तरुणांसाठी संदेश
आजच्या स्पर्धात्मक व आव्हानात्मक युगात स्वामी विवेकानंदांचे विचार तरुण पिढीस दिशा देणारे आहेत. आत्मविश्वास, कर्तव्यनिष्ठा, राष्ट्रप्रेम आणि मानवसेवा या मूल्यांचा स्वीकार केल्यासच खऱ्या अर्थाने सक्षम भारत घडू शकतो. स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करणे हीच आजच्या तरुणांसाठी खरी प्रेरणा आणि राष्ट्रासाठी खरी गरज आहे.

✍️ लेखिका :
शिक्षिका वर्षा कमलाकर चौधरीजिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मार्डी
तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव
Back to top button
error: Content is protected !!