महाराष्ट्र

श्री विठ्ठलसाई कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांची बिनविरोध निवड

लोहारा ( जि. धाराशिव ) : उमरगा तालुक्यातील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी मंत्री बसवराज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमनपदी सादिकसाहेब काझी यांची निवड करण्यात आली आहे.

मुरुम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार झाली आहे. कारखान्याचे सर्व २१ संचालक बिनविरोध निवडुन आल्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाच्या निवडीसाठी कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी (दि.२२) कारखाना कार्यस्थळावर बैठक पार पडली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणुन जिल्हा उपनिबंधक पांडूरंग साठे यांनी काम पाहिले. चेअरमन पदासाठी माजी मंत्री बसवराज पाटील यांचे नांव रामकृष्णपंत खरोसेकर यांनी सुचवले त्यास केशवराव पवार यांनी अनुमोदन दिले. तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी सादिकसाहेब काझी यांचे नांव शरणप्पा पत्रिके यांनी सुचवले त्यास माणिकराव राठोड यांनी अनुमोदन दिले.

दोन्ही पदासाठी सभेत एक एकच नांव सुचविल्याने अध्यासी अधिकारी यांनी चेअरमन पदासाठी बसवराज पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदासाठी सादिकसाहेब काझी यांची बिनविरोध एकमताने निवड झाल्याचे जाहीर केले. सभेस नवनिर्वाचित संचालक बापुराव पाटील, शरण बसवराज पाटील, विठ्ठलराव पाटील, संजय बिराजदार, दिलीप पाटील, ॲड. सुभाषराव राजोळे, विठ्ठलराव बदोले, राजीव हेबळे, संगमेश्वर घाळे, शब्बीर जमादार, शिवलिंगप्पा माळी, शिवमुर्ती भांडेकर, दिलीप भालेराव, सौ. इरम्माताई स्वामी, श्रीमती मंगलताई गरड व कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. गवसाणे उपस्थित होते.

यावेळी बोलताना कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन श्री पाटील म्हणाले की, कारखान्याची निवडणुक बिनविरोध झाल्याने सभासदांनी आमच्यावर खुप मोठा प्रचंड विश्वास दाखविला आहे. याबद्दल सभासदांचे आभार व्यक्त करून, अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो. यापुढे संचालक मंडळाची आणखीन जबाबदारी वाढली आहे. त्यांच्या विश्वासास पात्र राहून यापुढेही सभासदांचे हित डोळयापुढे ठेवून उपपदार्थ निर्मीतीसह कारखान्याची उत्तरोत्तर प्रगती साधली जाईल. येत्या गळीत हंगामात साडेपाच लाख मे.टन ऊस गाळपाचे उदिष्ठ असुन ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, तोडणी वाहतुक यंत्रणा, कारखाना कर्मचारी व कामगार या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या उदिष्ठ पुर्तता होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच आपल्या कारखान्याचे प्रति दिनी ३० हजार लिटर डिस्टलरी/इथेनॉल प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असुन लवकरच प्रकल्प उभारणीच्या कामास सुरूवात होणार आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेद्रजी मोदी, केंद्रिय सहकार मंत्री अमीतजी शहा व आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फार मोठे सहाय्य आपल्याला मिळाले आहे.
यावेळी कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालकांचा यथोचित सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, कामगार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!