
अलिबाग,दि.22 (जिमाका):- अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली कारागृह विभागाचे सर्व कारागृह उपमहानिरीक्षक व अधीक्षक यांच्या कारागृह विभागातील अडीअडचणी जाणून घेवून त्या दूर होण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपायोजनांबाबतची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली.
या बैठकीमध्ये पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या— महाराष्ट्र राज्यातील कारागृहामध्ये वय वर्षे 50 व त्यापेक्षा जास्त वय असलेले बंदी बंदीस्त असतात. त्यामध्ये काही वयोवृध्द बंदी आजारी असतात, या बाबींचा सारासार विचार करुन वय 50 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व न्यायाधीन बंद्यांना साधारणत: जाड बेडींग (अंथरुण) तसेच उशी स्वखर्चाने आणण्याची परवानगी देण्याबाबत उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना प्रारुपास मान्यता दिली आहे.
त्यानुसार कारागृहातील दाखल वय वर्षे 50 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व न्यायाधीन बंद्यांना साधारणत: जाड बेडींग (अंथरुण) तसेच उशी स्वखर्चाने आणणे, यासाठी परवानगीच्या अधिकाराबाबत सर्व प्रादेशिक विभाग प्रमुख व कारागृह अधीक्षक यांना परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे, असे पुणे कारागृहाचे जनसंपर्क अधिकारी एस.बी.दराडे यांनी कळविले आहे.