लोहारा (जि. धाराशिव) : लोहारा येथील श्री. प्रतीक शेषेराव पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून भौतिकशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
प्रतीक पाटील यांनी “हायड्रोजन निर्मितीसाठी अत्यंत कार्यक्षम फेराइट नॅनो-कॅटलिस्टची निर्मिती व वैशिष्ट्यांचे विश्लेषण”
या विषयावर सखोल संशोधन करून प्रबंध सादर केला होता. विद्यापीठाने हा प्रबंध मान्य करत त्यांना पीएच.डी. पदवीस पात्र घोषित केले आहे.
हे संशोधन कार्य निवृत्त प्रा. (डॉ.) के. एम. जाधव, भौतिकशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले. दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी त्यांची पीएच.डी. व्हायवा-वोसे परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली.
संशोधन कालावधीत प्रतीक पाटील यांचे जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये तब्बल १५ संशोधन पेपर प्रकाशित झाले असून, त्यांच्या संशोधन कार्याची देश-विदेशात दखल घेतली जात आहे. हायड्रोजन ऊर्जेसारख्या भविष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रात केलेले त्यांचे संशोधन वैज्ञानिक क्षेत्रासाठी मोलाचे ठरत आहे.
या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल प्रतीक पाटील यांचे कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक, मित्र, सहकारी तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.