महाराष्ट्र
सद्भावना पदयात्रेला उत्साहात सुरुवात – महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्यासाठी पुढाकार

लातूर : “समाज एकत्र आणण्याचा वसा, सद्भावनेच्या मार्गाने पुढे जाण्याचा संकल्प!” या विचाराने प्रेरित होत आज मस्साजोग येथून सद्भावना पदयात्रेला उत्साहात सुरुवात झाली. या यात्रेचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी सपकाळ साहेब करत आहेत.
यात्रेच्या प्रारंभी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वर्गीय संतोष (अण्णा) देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सांत्वन व आधार दिला. सद्भावना पदयात्रेचा प्रमुख उद्देश म्हणजे लोकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे.
या यात्रेदरम्यान काँग्रेस पक्षाच्या विचारधारेनुसार एकात्मता, बंधुत्व आणि सामाजिक सलोखा या मूल्यांना प्रोत्साहन देण्याचा संकल्प करण्यात आला. यात्रेच्या निमित्ताने लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, सुंदर भैय्या पाटील, माजी नगरसेवक सचिन बंडा पल्ले, विजयकुमार साबदे, मनोज शेळके, प्रवीण सूर्यवंशी, अलिशेर शेख, शिवकांत गंगापुरे आदी पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी मान्यवरांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना महात्मा गांधी यांची प्रतिमा भेट देऊन सद्भावनेच्या संदेशाचा प्रसार केला.
मस्साजोग येथून सुरुवात झालेली ही पदयात्रा विविध गावांमध्ये जाऊन जनतेशी संवाद साधत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करेल. लातूर जिल्ह्यातील असंख्य काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या यात्रेत सहभाग घेतला असून, जनतेच्या व्यापक हितासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार आहे.