लोहारा, ( जि धाराशिव ) : नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय, लोहारा येथील जीवशास्त्र विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक लक्ष्मीकांत प्रल्हादराव कुलकर्णी सर हे ३१ वर्षांच्या दीर्घ आणि यशस्वी शैक्षणिक सेवेनंतर आज, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या संयमी स्वभावाने, उत्कृष्ट अध्यापन कौशल्याने आणि विद्यार्थ्यांवर असलेल्या निस्सीम प्रेमामुळे ते शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्गात विशेष प्रिय ठरले आहेत.
शिक्षण आणि कारकीर्द
प्रा. लक्ष्मीकांत कुलकर्णी यांचा जन्म १ मार्च १९६७ रोजी जळकोट (ता. तुळजापूर, जि. धाराशिव ) येथे झाला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर येथून M.Sc. (जीवशास्त्र) पदवी प्राप्त केली आणि उमरगा येथील आदर्श कॉलेज मधून B.Ed ही पदवी घेतली.
१९९० च्या दशकाच्या सुरुवातीस स्वामी रामानंद तीर्थ विद्यालय, हिप्परगा येथे त्यांनी शिक्षक म्हणून अध्यापनास सुरुवात केली. त्यानंतर १९९४ साली लोहारा येथे नव्याने स्थापन झालेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात जीवशास्त्र विषयाचे अध्यापन सुरू केले. आपल्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना घडवले. आज त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदांवर कार्यरत आहेत, काही शास्त्रज्ञ तर काही वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत.
कर्तव्यदक्षता आणि विद्यार्थ्यांवर प्रभाव
कुलकर्णी सर हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले. “असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास” या उक्तीचा प्रत्यय त्यांच्या अध्यापन पद्धतीतून सतत जाणवायचा. विद्यार्थ्यांना कठीण संकल्पना सहजगत्या समजावून सांगण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात.
त्यांनी लातूर विभागीय शिक्षण मंडळात जीवशास्त्र विषयाचे मुख्य नियामक आणि केंद्र संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. प्रशासनातही त्यांचा हातखंडा होता. कोणतीही जबाबदारी वरिष्ठांनी दिली तरी ती त्यांनी पूर्ण समर्पणाने पार पाडली.
कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक भान
कुलकर्णी सर यांचे वडील प्रल्हादराव कुलकर्णी महसूल विभागात मंडळ अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या अकाली निधनानंतर, कुटुंबातील ज्येष्ठ म्हणून संपूर्ण जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पार पाडली. आपल्या बहिणी व भावंडांचे शिक्षण आणि भविष्य घडवताना त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही.
त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे ते आजही निरोगी आणि उत्साही आहेत. दररोज पहाटे उठून ६ किमी चालणे, योग आणि प्राणायाम हा त्यांच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग आहे. त्यांचा वक्तशीरपणा, टापटीप स्वभाव, सुंदर हस्ताक्षर, सदाचार आणि समर्पित वृत्ती यामुळे ते सर्वांच्या मनात स्थान निर्माण करू शकले.
सन्मान आणि सेवानिवृत्तीनंतरची वाटचाल
त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाविद्यालयाने त्यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन सन्मानित केले आहे. शिक्षण क्षेत्रात इतकी वर्षे निस्वार्थ सेवा दिल्यानंतर आता ते आपल्या निवृत्तीचा आनंद उपभोगणार आहेत.
सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सक्रिय राहणार असून, भविष्यातही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
शुभेच्छा संदेश
महाविद्यालयातील प्राचार्य, सहकारी शिक्षक, माजी विद्यार्थी आणि पालकवर्ग यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
“सेवा परमो धर्मः” या तत्त्वावर चालणाऱ्या कुलकर्णी सरांना निरोगी, आनंदी आणि समृद्ध आयुष्याच्या असंख्य शुभेच्छा!