महाराष्ट्र
घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवीजींच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ
भाविकांनी शिस्तबध्द पध्दतीने व धार्मिक वातावरण कायम राखून दर्शन घ्यावे - जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे आवाहन
मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था
धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे आज गुरूवार आश्विन शुक्ल प्रतिपदा आई तुळजाभवानीची अलंकार महापूजा व घटस्थापनेचा धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला.श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारीक पध्दतीने श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.त्यानंतर दुपारी १२ वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते आज ३ ऑक्टोबर रोजी विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंत्रोच्चाराने,आई राजा उदो-उदोचा जयघोष आणि पारंपारिक वाद्य संबळाच्या साथीने सर्व पुजाविधी करण्यात आले.
घटकलशाची पारंपरिक पध्दतीने पूजा करून घटकलशांची घटस्थापना देवीजींच्या गाभाऱ्यात करण्यात आली.तसेच खंडोबा मंदिर,यमाईदेवी मंदिर,टोळभैरव आणि आदिमाया आदिशक्ति या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली.
मंदिर व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.भाविकांनी दर्शन मंडप सुविधेचा लाभ घ्यावा.शिस्तबध्द पध्दतीने व धार्मिक वातावरण कायम राखून दर्शन घ्यावे.तसेच कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशन अथवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. अनेक भाविक वेगवेगळ्या भागातून पायी चालत तुळजापूर येथे येतात त्यांनी वाहतूक मार्गावरुन चालतांना काळजी घ्यावी,असे आवाहन ही जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी घटस्थापनेनंतर केले.त्यांनी सर्व भाविकांना शारदीय नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.
प्रतिवर्षाप्रमाणे या उत्सवासाठी महाराष्ट्रासह तेलंगणा,आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक तुळजापूर नगरीत दाखल झाले आहेत.आज हजारो भाविकांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.वेगवेगळ्या गावातूनही युवक भवानी ज्योत घेवून जाण्यासाठी तुळजापूरकडे चालत येतानाचे चित्र दिसत होते.