क्षयरोग रुग्णांना स्पर्श ग्रामीण रुग्णालयचा मानवतावादी हात

लोहारा (उस्मानाबाद ) : प्रधानमंत्री टी. बी. मुक्त अभियान अंतर्गत टी.बी.चे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी मोफत उपचार केला जातो. या उपचारा सोबत रुग्णांना सकस मोफत आहारासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन अशा रुग्णांना किमान सहा महिने दत्तक घेऊन त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून सकस आहार पुरविण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्रजी मोदी यांनी केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात हे अभियान प्रभावी पणे राबविण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केले.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफिक अन्सारी यांनी संबंधित बैठक घेऊन जिल्ह्यातील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांना यामध्ये पुढाकार घेण्याचे अपिल केले. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत ग्रामीण रुग्णालय सास्तूर (स्पर्श) तर्फे लोहारा तालुक्यातील क्षयरोग उपचार चालू असलेल्या 76 रुग्णांना त्यांचा उपचार संपेपर्यंत (सहा महिने) त्यांच्या उदरनिर्वाहासाठी, सकस आहारासाठी अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी दत्तक घेतले आहे. दि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रामीण रुग्णालय सास्तुर च्या सभागृहात मा. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हलगुडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफिक अन्सारी यांच्या हस्ते या रुग्णांना या महिन्यासाठी अन्नधान्य वाटप करण्यात आले यात गहूआटा, तांदूळ, तूरडाळ, मूगडाळ, शेंगदाणे, गोड तेल व अंगाचे साबण इ. वाटप करण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात जास्त 76 रुग्णांना स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुरच्या वतीने आहार वाटपासाठी रुग्णांना दत्तक घेतल्यामुळे स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे व प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी अभिनंदन केले व ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तुरचा हा मानवतावादी दृष्टिकोन समाजातील इतर नागरिकांनी आत्मसात करावा व क्षयरोग निर्मूलनासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉ. सुशील चव्हाण, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. के.के. मिटकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्षयरोग कार्यालय उस्मानाबादचे जिल्हा पर्यवेक्षक श्री. शरदकुमार बोने, तालुका पर्यवेक्षक श्री ज्ञानेश्वर बिराजदार, श्री नागेश ढगे यांनी विशेष परिश्रम व सहकार्य केले. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल प्रकल्प अधिकारी श्री रमाकांत जोशी यांनी सर्व मान्यवर रुग्ण यांचे आभार व्यक्त केले.