शैक्षणिक

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श युवापिढीने घ्यावा – उपप्राचार्य यशवंत चंदनशिवे

लोहारा | प्रतिनिधी
लोहारा शहरातील जिजाऊ प्रशासकीय सेवा महाविद्यालयात दिनांक 26 जून 2026 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना उपप्राचार्य यशवंत चंदनशिवे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आदर्श युवापिढीने घ्यावा, असे प्रतिपादन केले.

यावेळी ते म्हणाले की, एकोणिसाव्या शतकातील दूरदृष्टी असलेले महान शासक म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात सर्व जातीधर्मातील मुला-मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शाळा, महाविद्यालये व वसतिगृहांची स्थापना केली. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विविध योजना राबवल्या.

तसेच समाजात शारीरिक सक्षमता वाढावी म्हणून कुस्ती आखाड्यांची निर्मिती केली. प्रशिक्षित शिक्षक घडविण्यासाठी डी.एड. शिक्षण सुरू केले आणि प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचे शासकीय फर्मान काढले. सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी सतीप्रथा बंद करणे, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणे, जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी सामूहिक चहापान, भोजनावळी व पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याचे कार्य त्यांनी केले.

याशिवाय त्यांनी क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या. शेतकरी हितासाठी विविध योजना राबवून दुष्काळी परिस्थितीत गरीब व शेतकऱ्यांच्या हाताला काम उपलब्ध करून दिले. राधानगरी धरणाची उभारणी करून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली. आपल्या 28 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व शेतकरी हिताची अनेक महत्त्वपूर्ण कामे केली, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर सुधाकर चंदनशिवे, प्रा. रमेश गिराम, प्रा. प्रियांका जमादार, प्रा. प्राजक्ता लकडे, वैष्णवी लोहार, राणी माटे यांच्यासह महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!