लोहारा (जिल्हा धाराशिव) : शहरातील श्री जगदंबा मंदिरातून तांब्याच्या पादुकांची चोरी करणाऱ्या चोरट्याला लोहारा पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून पादुका, तांब्याचे कासव व समई जप्त करण्यात आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती.
शनिवारी सकाळच्या पूजनावेळी पादुका जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर मंदिर प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये गुरुवारी भरदिवसा एक संशयित व्यक्ती मंदिरात प्रवेश करून काहीच मिनिटांत पादुका चोरून पसार झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. विशेष म्हणजे, यापूर्वी देखील पादुकांची चोरी झालेली होती, अशी माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद गिरी यांनी दिली.
या घटनेची गंभीर दखल घेत लोहारा पोलिसांनी तपासाला वेग दिला. सीसीटीव्हीमधील संशयिताचा फोटो आधारे शोधमोहीम राबवण्यात आली. सोमवारी आरोपी जेवळी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निरंजन फुलमाळी, आकाश भोसले, जोतिराम भोजने व गृहरक्षक बिलाल गावंडी यांनी जेवळी येथे दुपारी तीन वाजता सापळा रचून बाबुराव इंगळे (रा. बलसूर, ता. उमरगा) याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या पादुका, कासव व समई जप्त करण्यात आले आहेत. लोहारा पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.