लोहारा (प्रतिनिधी) : दुष्काळाच्या झळा सर्वसामान्यांसह प्रत्येक घटकाला बसत असताना पत्रकारांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत लोहारा येथील हाजी शब्बीर अहमद अन्सारी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने माणुसकीचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. तालुक्यातील पत्रकारांच्या कुटुंबांना थंड पिण्याच्या पाण्याचे कॅन मोफत भेट देण्याबरोबरच यापुढे वर्षभर दररोज थंड पाण्याचा मोफत पुरवठा करण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
पत्रकार हा समाजातील प्रश्नांना वाचा फोडणारा आणि प्रशासन व जनतेमधील दुवा म्हणून काम करणारा महत्त्वाचा घटक आहे. ऊन, वारा, पाऊस आणि दुष्काळ अशा कोणत्याही परिस्थितीत पत्रकार आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या या योगदानाची जाणीव ठेवून संस्थेने पत्रकारांच्या कुटुंबांसाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. शनिवारी (३१ ऑक्टोबर) लोहारा येथे या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांच्या हस्ते तालुक्यातील सुमारे १८ पत्रकारांना थंड पिण्याच्या पाण्याचे कॅन वितरित करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना कोळेकर म्हणाले, हाजी शब्बीर अन्सारी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्य सर्वसमावेशक असून जात-पात, धर्म-पंथ न पाहता संस्था सर्व समाजासाठी काम करते. पत्रकारांच्या कुटुंबांची दुष्काळाच्या काळात काळजी घेण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने मदतीचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जसवंतसिंह बायस यांनी केले. त्यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत पत्रकारांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. सूत्रसंचालन विक्रांत संगशेट्टी यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष महेबूब फकीर ऊर्फ मुन्ना फकीर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेबूब फकीर, युसुफ कुरेशी, जिंदाशा फकीर, सादीक फकीर, अन्वर कुरेशी, जाकेर कुरेशी, महंमद हुसेन बागवान, रमेश रेणके, इरफान सय्यद, ताहेर फकीर, इकबाल कुरेशी, महेबूब कुरेशी, सुरेश थोरात, अफ्ताफ कुरेशी, हैदर शेख, सरफराज फकीर, जम्मनशा फकीर, वजीर अत्तार, राजू कांबळे आदी उपस्थित होते.
पत्रकारांमध्ये ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, अशोक दुबे, इकबाल मुल्ला, जसवंतसिंह बायस, सुमित झिंगाडे, गणेश खबोले, यशवंत भुसारे, तानाजी माटे, सदाशिव जाधव, विक्रांत संगशेट्टी आदींची उपस्थिती होती.
दुष्काळाच्या काळात पाण्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होत असताना पत्रकारांच्या कुटुंबांना वर्षभर मोफत थंड पाणी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा निर्णय सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडविणारा ठरला आहे.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!