धाराशिवमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक
परिस्थितीने पाय खेचले, पण जिद्दीने आकाश गाठले; जब्बार मुल्लांची लेक होणार डॉक्टर !
वडिलांच्या कष्टांचे लेकीने केले चीज; वसीया मुल्लाची बीएएमएस वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड, ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार

लोहारा ( जि. धाराशिव ) : घरची परिस्थिती हलाखीची… वडिलांचा छोटासा हॉटेल व्यवसाय… मर्यादित उत्पन्नात कुटुंबाचा गाडा ओढताना मुलीच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याची धडपड… मात्र या परिस्थितीपुढे वडिलांनी हार मानली नाही आणि लेकीनेही आपल्या स्वप्नांशी तडजोड केली नाही. वडिलांच्या घामाला आणि लेकीच्या जिद्दीला अखेर यशाची किनार लाभली. लोहारा शहरातील जब्बार मुल्ला यांची कन्या वसीया हिची बीएएमएस (आयुर्वेदिक वैद्यकीय अभ्यासक्रम) या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तिने मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
लोहारा शहरातील हॉटेल व्यावसायिक जब्बार मुल्ला यांचा व्यवसाय अगदी छोट्या स्वरूपाचा. रोजच्या कमाईतून घरखर्च भागवताना मुलीच्या उच्च शिक्षणाचा खर्च उचलणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते. मात्र, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मुलीने शिकून मोठे व्हावे, तिच्या स्वप्नांना बळ मिळावे, हीच त्यांची मनापासून इच्छा होती. वडिलांच्या या कष्टांची जाणीव ठेवून वसीयानेही अभ्यासात कोणतीही कसूर केली नाही.
परिस्थितीशी संघर्ष करत शिक्षणाची वाट धरली
वसीयाने लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले. आर्थिक अडचणी, मर्यादित सुविधा आणि अनेक आव्हाने समोर असतानाही तिने शिक्षणाची वाट सोडली नाही. बारावी विज्ञान शाखेचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने नीट परीक्षेची तयारी केली. मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर तिने वैद्यकीय प्रवेशाची संधी मिळवली.
तिची अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील शिवाजीराव पवार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. एका छोट्या हॉटेल व्यावसायिकाच्या घरातून डॉक्टर होण्याच्या दिशेने सुरू झालेला तिचा प्रवास केवळ मुल्ला कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण लोहारा शहरासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
शिष्यवृत्तीने दिले स्वप्नांना बळ
वसीयाच्या यशामागे तिच्या मेहनतीसोबतच सामाजिक मदतीचाही महत्त्वाचा वाटा आहे.
तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात आल्यानंतर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ज्ञानज्योती सामाजिक संस्थेने तिच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला.
संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष तथा उमरगा पंचायत समितीच्या सभापती ॲड. आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले यांनी वसीयाच्या शिक्षणाची दखल घेत तिला भरीव शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यामुळे पुढील शिक्षणाचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका होण्यास मदत झाली. आर्थिक अडचणींमुळे एखाद्या होतकरू विद्यार्थ्याचे स्वप्न अपूर्ण राहू नये, या भावनेतून संस्थेचे कार्य सुरू आहे. वसीयाला मिळालेली ही मदत तिच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला बळ देणारी ठरली आहे.
वडिलांच्या कष्टांना लेकीची यशस्वी सलामी!
वसीयाच्या यशामध्ये तिच्या वडिलांनी घेतलेल्या कष्टांचे मोल मोठे आहे. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या वडिलांच्या त्यागाचे लेकीने आपल्या यशातून चीज केले आहे. उद्या वसीया डॉक्टर होऊन रुग्णसेवेत रुजू होईल, तेव्हा तिच्या यशामागील वडिलांचा संघर्ष आणि तिची जिद्द निश्चितच अनेकांना आठवेल.
वसीयाच्या या यशाबद्दल लोहारा शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार तसेच भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील प्राध्यापकांनी तिचे अभिनंदन केले आहे. माजी आमदार ज्ञानराज चौगुले, ॲड. आकांक्षाताई चौगुले आणि ज्ञानज्योती सामाजिक संस्थेच्या परिवारानेही तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
वसीयाचे यश हे केवळ एका मुलीचे वैयक्तिक यश नाही, तर प्रतिकूल परिस्थितीतही स्वप्न पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी संघर्ष करण्याचे सामर्थ्य दाखवणारी प्रेरणादायी कहाणी आहे. वडिलांच्या कष्टांना लेकीने दिलेली ही यशाची पावती लोहारा शहरासाठी अभिमानास्पद ठरली आहे.



