लोहारा (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांना संभाव्य धोके ओळखण्यास सक्षम बनविणे आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक माहिती देण्याच्या उद्देशाने कानेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘सुरक्षित बचपन अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात न्यायाधीश, पोलीस निरीक्षक आणि सरकारी वकिलांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेविषयी सविस्तर मार्गदर्शन करत स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहारा येथील न्यायाधीश श्री. शिवराज पाटील होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पवार, सरकारी वकील श्री. काळे आणि कास्ती बुद्रुकचे केंद्रप्रमुख श्री. गणगे उपस्थित होते.
यावेळी न्यायाधीश शिवराज पाटील यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, कोणत्याही संकटाच्या प्रसंगी कशी सतर्कता बाळगावी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य देत धोकादायक परिस्थिती ओळखण्याची जाणीव ठेवावी, असे त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.
पोलीस निरीक्षक श्री. पवार आणि सरकारी वकील श्री. काळे यांनीही विद्यार्थ्यांना सुरक्षिततेशी संबंधित विविध बाबी समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानेगावचे मुख्याध्यापक श्री. बालाजी साळुंके, संत मारुती महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. काशिनाथ पवार यांच्यासह दोन्ही शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री. गणगे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. मच्छिंद्र बोकडे यांनी केले, तर श्री. अरुण शिंदे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!