शैक्षणिकसामाजिक

स्वतःच्या खिशातून शाळेचा कायापालट; एकोंडीच्या शैक्षणिक प्रगतीत मुख्याध्यापक देवेंद्र आयलाने यांचे मोलाचे योगदान!

दुष्काळी परिस्थितीतही शाळेचा परिसर फुलवला; शिस्त, गुणवत्ता आणि लोकसहभागातून उभारली आदर्श शाळा

लोहारा ( जि. धाराशिव ) : शिक्षण हे केवळ नोकरीचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, याची प्रचिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोंडी (लो.) येथील मुख्याध्यापक देवेंद्र आयलाने यांच्या कार्यातून येत आहे. प्रसिद्धीचा कोणताही गाजावाजा न करता, स्वतःच्या खिशातून खर्च आणि अथक परिश्रमांच्या बळावर त्यांनी शाळेचा कायापालट घडवून आणला आहे. शिस्त, गुणवत्ता, स्वच्छता, निसर्गरम्य परिसर आणि लोकसहभाग यांच्या बळावर एकोंडीची शाळा आज आदर्श शाळा म्हणून नावारूपाला येत आहे.

देवेंद्र आयलाने यांनी शाळेची जबाबदारी स्वीकारल्यापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. शाळेचा परिसर केवळ इमारतीपुरता मर्यादित न ठेवता तो विद्यार्थ्यांना आनंदाने शिकण्याची प्रेरणा देणारा असावा, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. दुष्काळसदृश परिस्थितीतही स्वतःच्या खिशातून खर्च करून आणि प्रचंड मेहनत घेऊन शाळेचा परिसर हिरवागार व निसर्गरम्य बनविला. आज शाळेच्या आवारात प्रवेश करताच प्रसन्न वातावरणाचा अनुभव येतो. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरत आहे.
शाळेच्या भौतिक सुविधांसोबतच शैक्षणिक गुणवत्तेवरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. विद्यार्थ्यांमध्ये वेळेचे महत्त्व, स्वच्छतेच्या सवयी, नियमित अभ्यास आणि शिस्त रुजविण्यासाठी नियोजनबद्ध उपक्रम राबविले. शाळेतील एकसमान गणवेश पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक विषमतेची भावना दूर होण्यास मदत झाली असून समानता, आत्मविश्वास आणि एकोप्याची भावना वाढीस लागली आहे.

शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांना जोडले एका धाग्यात!
आयलाने सरांच्या कार्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी निर्माण केलेला समन्वय. सहकारी शिक्षकांना विश्वासात घेऊन त्यांच्या कौशल्यांना वाव दिला. शाळेचे कामकाज एका कुटुंबाप्रमाणे चालविताना गावातील नागरिक, पालक आणि तरुणांनाही शाळेच्या विकासात सहभागी करून घेतले. लोकसहभागातून शाळेचा विकास साधता येतो, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.

स्वतःच्या आर्थिक योगदानासह वेळ, श्रम आणि कौशल्याची गुंतवणूक करून शाळेच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या आयलाने सरांचे कार्य शिक्षण क्षेत्रातील निःशब्द क्रांतीच म्हणावी लागेल. त्यांच्या पुढाकारामुळे एकोंडी (लो.) येथील शाळा परिसराच्या सौंदर्यासोबतच शिस्त आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीतही प्रेरणादायी ठरत आहे.

या उपक्रमशील कार्याबद्दल लोहारा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, माकणी केंद्रप्रमुख मोहन अगंबरे, एकोंडी (लो.)च्या सरपंच सुलक्षणाताई सूर्यवंशी, उपसरपंच विकास पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी जाधव, उपाध्यक्ष प्रवीण पाटील व सर्व सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिक, पालक तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी देवेंद्र आयलाने यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!