महाराष्ट्रशैक्षणिक

लोहाऱ्यात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा; मुंबई, पुणे, निलंगा आणि संभाजीनगरच्या स्पर्धकांनी जिंकली बाजी!

लोहारा ( जि. धाराशिव) / प्रतिनिधी

लोहारा शहरात शनिवारी एक वेगळाच माहोल अनुभवायला मिळाला. कारण, शंकरराव जावळे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात “सोशल मीडियाच्या चक्रव्युहात भारतीय तरुणाई” या ज्वलंत विषयावर आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा रंगली. स्व. शंकरराव जावळे पाटील यांच्या 31व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून राज्यभरातील तब्बल 25 स्पर्धकांनी या व्यासपीठावर आपली वक्तृत्वकला सादर केली.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. शंकरराव जावळे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे पाटील अध्यक्षस्थानी तर नगराध्यक्षा सौ. वैशाली खराडे, माजी प्राचार्य डॉ. अनिता मूदकण्णा मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते. परीक्षक मंडळात प्रा. डॉ. लक्ष्मण बिराजदार, प्रा. डॉ. तुळशीदास उकिरडे व प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांचा समावेश होता.

स्पर्धकांच्या दमदार भाषणांमुळे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट घुमत राहिला. शेवटी निकाल जाहीर होताच प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला. मुंबई विद्यापीठाचा यश रवींद्र पाटील याने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला व 11,051 रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मिळवले. त्याच्यानंतर एस. पी. कॉलेज, पुणेचा रमेश सुनिल कचरे द्वितीय ठरला तर निलंग्याच्या गीता माधव वाडकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. छत्रपती संभाजीनगरचा आदित्य दराडे याला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.

विजेत्यांचा सत्कार करताना सभागृहात टाळ्यांचा गजर घुमला. सहभागी सर्वांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरवण्यात आले.

या भव्य कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रा. मनोज सोमवंशी यांनी तर आभार प्रा. विनोद आचार्य यांनी मानले. लोहाऱ्याच्या इतिहासात नोंद होईल अशी ही वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांच्या आठवणीत दीर्घकाळ कोरली जाईल यात शंका नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!