लोहारा/प्रतिनिधी
शिक्षक म्हणजे फक्त धडे गिरवणारा नव्हे, तर ज्ञानाला सुलभतेने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा मार्गदर्शक. याचं जिवंत उदाहरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडीचे नाविन्यपूर्ण शिक्षक मल्लिकार्जुन शिवलिंग कलशेट्टी यांनी साकारलं आहे. यंदा शिक्षक दिनानिमित्त त्यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर झाला असून लोहारा तालुक्यात आनंदाचा माहोल आहे.
धोरणात्मक दृष्टीकोन, नवनवीन शैक्षणिक प्रयोग आणि विद्यार्थ्यांना गणितासारखा ‘अवघड’ विषय आवडीचा वाटावा यासाठी केलेल्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे कलशेट्टी यांना हा पुरस्कार मिळाला आहे. गणितीय खेळ, प्रयोगशील पद्धती आणि सोप्या सूत्रांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी गणित हा ‘भितीदायक विषय’ न ठेवता ‘खेळता-शिकता येणारा विषय’ बनवला.
हा पुरस्कार ध्येय शिक्षक, मात्रवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेत प्रदान करण्यात आला आहे.
या कामगिरीबद्दल लोहारा तालुक्यातील शिक्षक बांधव, ग्रामस्थ आणि शैक्षणिक वर्तुळातून कलशेट्टी सरांचे अभिनंदन होत आहे.
“गणित शिकवण्याची पद्धतच बदलली, म्हणूनच विद्यार्थ्यांच्या डोळ्यात गणिताची भीती नाही तर गोडी दिसतेय. हेच आमचं खरं समाधान आहे”, असं भावूक उद्गार कलशेट्टी सरांनी यावेळी काढले.