लोहारा : लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये दिनांक 4 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूलचे प्राचार्य शहाजी जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. यशवंत चंदनशिवे व संचालिका सविता जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विशेष म्हणजे चौथीतील विद्यार्थी शिवाजी शहाजी जाधव यांनी डॉ. राधाकृष्णन यांची वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी भाषणातून मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी प्रा. चंदनशिवे यांनी सांगितले की, “शिक्षक म्हणजे शिस्तप्रिय, क्षमाशील व कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व होय.” तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य जाधव यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी गौरी धवन व संस्कृती लोखंडे यांनी केले. आभार प्रदर्शन संचालिका सविता जाधव यांनी केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.