महाराष्ट्र
महात्मा बसवेश्वर यात्रेला जेवळी येथे उत्साही सुरुवात तीन दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

सुधीर कोरे | जेवळी (ता. लोहारा)
जेवळी (ता. लोहारा) येथील ग्रामदैवत समतेचे पुजारी महात्मा बसवेश्वर यांच्या यात्रेला बुधवार (ता. ३० एप्रिल) पासून उत्साही सुरुवात होत आहे. या निमित्ताने सालाबादप्रमाणे तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
जेवळीतील महात्मा बसवेश्वरांचे पुरातन मंदिर कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात श्रद्धेचे केंद्र आहे. बाराव्या शतकातील सामाजिक समतेच्या ऐतिहासिक कल्याण क्रांतीचा वारसा लाभलेल्या या मंदिराला परिसरातील वीरशैव समाजासह सर्व समाजातून मोठ्या श्रद्धेने भेट दिली जाते. महात्मा बसवेश्वरांनी ‘कायक वे कैलास’ हे श्रमप्रतिष्ठेचे वचन देत कर्मयोगाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या या विचारांचा प्रसार करणाऱ्या साधू-संतांनी येथे मंदिराची स्थापना केली असून येथे नंदीची स्थापना कृषी संस्कृती आणि श्रमप्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून करण्यात आली आहे.
जेवळीतील बसवेश्वर मंदिर दगडी बांधकामाचे असून येथे भक्तनिवास आणि जलकुंडाची सोय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात १९३७ साली या मंदिर परिसरात श्री बसवेश्वरांच्या नावाने शाळा सुरू झाली, जी या भागातील शिक्षणाची पहिली पहाट ठरली. आज हे क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झाले असून विविध विकासकामे सुरू आहेत.
यात्रा कार्यक्रमाची रूपरेषा:
-
बुधवार (ता. ३० एप्रिल):
-
पहाटे ५ वाजता बसवेश्वर मंदिरात रुद्राभिषेक.
-
सकाळी ८ वाजता बसवेश्वर जन्मोत्सवाचा पाळणा सोहळा.
-
९ वाजता १०१ बैलजोड्यांची गावातून सवाद्य मिरवणूक व त्यानंतर पशुप्रदर्शन व उत्कृष्ट पशुधनास बक्षीस वितरण.
-
रात्री १० वाजता होम कट्ट्यांवर अक्षता सोहळा व अग्नीप्रज्वलन.
-
-
गुरुवार (ता. १ मे):
-
सकाळी ८ वाजता नंदीध्वज व बसवेश्वर पालखीची विविध कलापथक व चित्ररथांसह मिरवणूक.
-
११ वाजता होम कट्ट्यावर पालखी व नदिकोलासह अग्नीस्पर्श.
-
रात्री ९ वाजता छबिना मिरवणूक व मैदानावर भव्य दारूकाम (फटाक्यांचा शो).
-
-
शुक्रवार (ता. २ मे):
-
दुपारी ४ वाजता कुस्ती दंगल.
-