महाराष्ट्र
मासुर्डी गावचे सुपुत्र वनरक्षक सुनील घोडके सुवर्ण पदकाने सन्मानित

औसा (प्रशांत नेटके) : महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामार्फत वनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा हा सन्मान लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मासुर्डी गावचे सुपुत्र आणि सध्या ठाणे वनवृत्त अंतर्गत शहापूर तालुक्यात कार्यरत असलेले वनरक्षक सुनील वसंत घोडके यांना प्राप्त झाला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्यगिरीबद्दल त्यांना २०२५ सालचा राज्यस्तरीय सुवर्ण पदक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गौरवाचा सोहळा
जागतिक वन दिनाच्या निमित्ताने मुंबई येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आणि अप्पर सचिव मिलिंद म्हैसकर तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक शोभीता बिश्वास यांच्या प्रमुख उपस्थितीत घोडके यांना सुवर्ण पदक व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
संकटांवर मात करून केले प्रभावी कार्य
सन २०२०-२१ या कालावधीत शहापूर तालुक्यातील खर्डी वन्यजीव क्षेत्रात कार्यरत असताना वनरक्षक सुनील घोडके यांनी अनेक आव्हानांवर मात करून वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी अत्यंत प्रभावीपणे कार्य केले. वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध अवैध कृत्यांविरुद्ध कठोर कारवाई केली.
घोडके यांची उल्लेखनीय कामगिरी :
अवैध वन्यप्राणी व्यापार रोखणे – जंगलात बेकायदेशीरपणे वन्यप्राणी पाळणाऱ्या तस्करांविरुद्ध कारवाई
अवैध वृक्षतोड थांबवणे – जंगलातील झाडांची बेसुमार तोड रोखण्यासाठी सतत गस्त
अवैध वाहतुकीवर कारवाई – दारू व रेतीच्या अवैध वाहतुकीस आळा घालण्यासाठी विशेष मोहीम
जंगल बंधाऱ्यांची निर्मिती – जंगलातील जलसंधारण वाढवण्यासाठी बंधारे उभारणी
वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करणे – उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न
वणवे रोखण्यासाठी उपाययोजना – जंगलातील आगी टाळण्यासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाय