लोहारा (जि. धाराशिव ) – देव, देश आणि धर्मासाठी बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंच्या स्मृती दिनानिमित्त न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना ‘छावा’ चित्रपट दाखवून अभिवादन करण्यात आले.
दिनांक 11 मार्च 2025 रोजी शाळेच्या प्रांगणात छत्रपती संभाजीराजेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य श्री. शहाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “सध्या महाराष्ट्रात बलिदान मास साजरा केला जात आहे. पाठ्यपुस्तकांबरोबरच ऐतिहासिक चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवले, तर त्यांना स्वराज्याच्या संघर्षशील इतिहासाचा अनुभव घेता येईल.”
संभाजीराजेंच्या शौर्यगाथेचा उल्लेख करताना त्यांनी कविता सादर केली –
“तुमच्या तेजाने तळपतो पुरंदरचा माथा,
सह्याद्रीच्या कडेकपारी सांगतात शंभुराजे तुमच्या पराक्रमाची गाथा…“
चित्रपटाच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी “छत्रपती संभाजी महाराज की जय”, “जय भवानी – जय शिवराय”, “हर हर महादेव” अशा उत्साही घोषणा दिल्या. काही प्रसंग पाहताना शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर काही प्रसंग पाहताना अंगावर शहारे आल्याचेही त्यांनी सांगितले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. यशवंत चंदनशिवे आणि श्री. सिद्धेश्वर सुरवसे यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या संचालिका सविता जाधव, पालक प्रतिनिधी श्री. शंकर जाधव आणि विद्यार्थी कु. मनस्वी देवकर यांनी या चित्रपट प्रदर्शनाच्या अनुभवांविषयी मनोगत व्यक्त केले.
छत्रपती संभाजीराजेंच्या अद्वितीय शौर्याची आठवण ठेवण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन अत्यंत गरजेचे आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.