लोहारा ( धाराशिव ) : लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती “युवा दिन ” म्हणून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शहाजी जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून सर्पमित्र श्रीनिवास माळी, पालक प्रतिनिधी अश्विनी कळसकर, सविता जाधव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. चंदनशिवे यांनी या दोघांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले की जिजाऊ माँ साहेब यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले, आणि त्यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण करताना देव, देश आणि धर्म याच्या संरक्षण व संवर्धनासाठी अवघे आयुष्य पणास लावले. तसेच स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील धर्मपरिषदेत आपल्या भाषणाची सुरुवातच येथे उपस्थित “माझ्या बंधू आणि भगिनींनो” असे करून संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती व माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांनी सर्व तरुणांना असा उपदेश केला की, उठा,जागे व्हा आणि ध्येयप्राप्त केल्याशिवाय थांबू नका!
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा माने यांनी तर आभारप्रदर्शन सिद्धेश्वर सूरवसे यांनी केले. यावेळी स्कूलमधील सोनाली काटे, वैशाली गोरे, लक्ष्मी करदोरे, सरिता पवार, सुलोचना वकील, हेमा पाटील, रेश्मा शेख यांच्यासह सर्व विध्यार्थी ,पालकवर्ग उपस्थित होते.