धाराशिवशैक्षणिक

जिल्हा परिषद शाळेचा ‘इंटरनॅशनल स्कूल’सारखा थाट! एकोंडीमध्ये शिक्षकांचा अनोखा उपक्रम

विद्यार्थ्यांना पँट-शर्ट, कोट-ब्लेझरसह आकर्षक गणवेश मोफत; शिक्षकांचा १ लाख १५ हजार रुपयांचा पुढाकार, विद्यार्थी-पालकांमध्ये आनंदाचे वातावरण

लोहारा : खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील आकर्षक गणवेशांचे आकर्षण आता जिल्हा परिषद शाळेतही पाहायला मिळत आहे! लोहारा तालुक्यातील एकोंडी लो येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत सर्व मुला-मुलींना पँट, शर्ट आणि कोट-ब्लेझरचा समावेश असलेले आकर्षक गणवेश मोफत दिले आहेत. सुमारे १ लाख १५ हजार रुपये किमतीचे गणवेश उपलब्ध करून देत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला आहे.

या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थी एखाद्या इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांप्रमाणे देखणे दिसत असून, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेच्या या वेगळ्या प्रयोगाची परिसरात चर्चा सुरू आहे.
शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि समानतेची भावना निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून एकोंडी लो येथील शाळेने हा उपक्रम हाती घेतला. विद्यार्थ्यांनी आकर्षक गणवेश परिधान करून शाळेत यावे, त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ नये आणि आपल्या शाळेचा अभिमान वाटावा, या उद्देशाने शिक्षकांनी एकत्रित पुढाकार घेतला.

शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र आयलाने यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक वनराज सूर्यवंशी, प्रदीपकुमार गुडले, प्रतिभा येदले आणि सुश्मिता मलकलपट्टे यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले. त्यांच्या पुढाकारातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पँट-शर्टसोबत कोट-ब्लेझरचा समावेश असलेले गणवेश मोफत उपलब्ध करून देण्यात आले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शिक्षकांनी सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा खर्च केला.

खासगी शाळांच्या तोडीचा लूक; विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावणार!

कोट-ब्लेझरसह आकर्षक गणवेश परिधान केलेले विद्यार्थी शाळेत येताच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात वेगळाच उठाव दिसून येत आहे. या गणवेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकसमानतेची भावना निर्माण होण्याबरोबरच शिस्त आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थीही कोणत्याही खासगी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा कमी नाहीत, हा ठाम संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक वातावरणासोबतच व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसाठी केलेला हा प्रयत्न विशेष कौतुकास्पद आहे. शाळेतील मुला-मुलींना एकसारखा आकर्षक गणवेश मिळाल्याने पालकांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिक्षकांच्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक

या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, केंद्रप्रमुख मोहन अगंबरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी जाधव, उपाध्यक्ष प्रवीण पाटील व सर्व सदस्य, गावच्या सरपंच सुलक्षणाताई सूर्यवंशी, उपसरपंच विकास पाटील तसेच गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी मुख्याध्यापक देवेंद्र आयलाने आणि शिक्षकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर आत्मविश्वासाने जगण्याची प्रेरणाही मिळावी, या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. शिक्षकांची इच्छाशक्ती, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेला जिव्हाळा एकत्र आला, तर ग्रामीण शाळाही वेगळा आदर्श निर्माण करू शकतात, हे एकोंडी लो येथील शाळेने दाखवून दिले आहे.
“जिल्हा परिषद शाळेतील मुले कोणत्याही शाळेपेक्षा कमी नाहीत!”

“कोट, टाय आणि पँट या नवीन गणवेशामुळे विद्यार्थी अत्यंत छान दिसत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासोबत शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुले कोणत्याही खासगी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांपेक्षा कमी नाहीत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम मिळावा आणि आपल्या शाळेची प्रतिमा अधिक उंचावावी, यासाठी हा प्रयत्न केला आहे,” अशी भावना मुख्याध्यापक देवेंद्र आयलाने यांनी व्यक्त केली.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!