धाराशिव : खरीप हंगाम 2024 अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील 75,677 शेतकऱ्यांना काढणी पश्चात कव्हर अंतर्गत 55 कोटी 16 लाख रुपयांची पीक नुकसानभरपाई मिळणार असल्याची माहिती पीक विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी दिली आहे.
खरीप 2024 मध्ये 7,19,167 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. या अंतर्गत एचडीएफसी पीक विमा कंपनीला केंद्र, राज्य व शेतकरी यांच्याकडून मिळून सात कोटी 19 लाख 167 रुपये हप्ता देण्यात आला होता.
याआधीच विविध कव्हर्स अंतर्गत 5,19,747 शेतकऱ्यांना 229 कोटी 36 लाख रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. त्यातील 5,12,058 शेतकऱ्यांना 218 कोटी 8 लाख रुपयांचे प्रत्यक्ष वाटप झाले आहे. मात्र, 7,689 शेतकऱ्यांची भरपाई 1,000 रुपयांपेक्षा कमी असल्याने शासन नियमांनुसार त्यांना 1,000 पेक्षा जास्त रक्कम देणे बंधनकारक आहे. यासाठी 1 कोटी 28 लाख रुपयांची रक्कम शासनाकडून येणे बाकी आहे.
राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने नुकतेच विविध पीक विमा कंपन्यांना 1,000 कोटी रुपयांच्या थकीत रकमेच्या मंजुरीला मान्यता दिली आहे. लवकरच हा निधी वितरित होणार असून त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही त्यांच्या हक्काची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
विशेष बाब म्हणजे, गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकूण 596 कोटी 15 लाख रुपयांचा विमा हप्ता भरला, मात्र त्यांना मिळणारी नुकसानभरपाई केवळ 273 कोटी रुपये इतकीच ठरणार आहे.