धाराशिवमहाराष्ट्र

जेवळीत ‘शोले स्टाईल’ आंदोलन; मराठा आरक्षणासाठी पाण्याच्या टाकीवर चढले आंदोलक

लोहारा (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जेवळी येथे गुरुवारी सकल मराठा समाजाच्या वतीने ‘शोले स्टाईल’ तीव्र आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता आंदोलक पाण्याच्या टाकीवर चढल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मराठा समाजाला हक्काचे व न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळावे, तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला यापूर्वीच निवेदन देण्यात आले होते.

आंदोलनाचे नेतृत्व व नियोजन बाळासाहेब पाटील, प्रशांत काळे, धनराज बिराजदार, महेश गोरे, तानाजी पाटील, बालाजी यादव, अभिषेक सूर्यवंशी, नितीन गोरे, खंडू भोंडवे, तुळशीदास पवार, संजय मुरटे, नेताजी शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी तालुक्यातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलन करीत आहेत. सध्या ते अंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले असून, त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत आहे. शासनाने त्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या आहेत प्रमुख मागण्या
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.
मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे कायदेशीर आरक्षण देण्यात यावे. मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची शासनाने गंभीर दखल घेऊन आवश्यक वैद्यकीय व प्रशासकीय पावले उचलावीत.

पोलिसांचा बंदोबस्त
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोहारा पोलिस ठाण्याचे बीट अंमलदार श्रीकांत राठोड यांच्यासह पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी व तलाठीही घटनास्थळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!