लोहारा (प्रतिनिधी) : धाराशिव येथे गुरुवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीस आपण अनुपस्थित राहिल्याने प्रसारमाध्यमांतून उलटसुलट चर्चा सुरू झाली. मात्र, मराठवाड्याच्या विकासासाठी, दुष्काळाच्या प्रश्नासाठी आणि शेतकरी, बेरोजगार युवकांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेल्या ‘तुमसे ना हो पायेगा’ या जनआंदोलनाला आपण डीपीडीसी बैठकीपेक्षा अधिक महत्त्व दिले, असे स्पष्टीकरण उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी दिले.
मराठवाड्याच्या विकासातील अनुशेष, दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली १ ते १७ सप्टेंबरदरम्यान ‘तुमसे ना हो पायेगा’ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह मराठवाड्यातील आमदार, जिल्हाप्रमुख, पदाधिकारी तसेच दुष्काळग्रस्त जनता सहभागी झाली. त्यामुळे या जनआंदोलनात सहभागी होण्याला आपण प्राधान्य दिले, असे स्वामी यांनी सांगितले.
निधीबाबत सापत्न वागणुकीचा आरोप
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विरोधी पक्षाचा आमदार म्हणून सत्ताधाऱ्यांनी आपले म्हणणे ऐकून घेतले; मात्र निधीच्या बाबतीत सापत्न वागणूक मिळाल्याचा आरोप आमदार स्वामी यांनी केला. मतदारसंघाच्या विकासासाठी मागितलेला निधी हा जनतेच्या विकासासाठीच होता. मात्र, विरोधी पक्षाचा आमदार असल्याने हा निधी मिळू दिला गेला नाही, असा दावा त्यांनी केला. पालकमंत्री सरनाईक यांच्याकडे निधीसाठी वारंवार मागणी करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचेही त्यांनी म्हटले.
‘दुष्काळ धाराशिवच्या पाचवीला पुजला’
मराठवाड्यात, विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील उमरगा-लोहारा तालुक्यात दुष्काळाची समस्या सातत्याने निर्माण होत आहे. २०२४ मध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर २०२५ मध्ये मे महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा फटका बसला. शासनाने मोठे पॅकेज जाहीर केले; मात्र त्यातून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती मदत मिळाली, असा सवाल स्वामी यांनी उपस्थित केला.
यंदा जूनपासून पावसाने ओढ दिल्याने उडीद, मूग, सोयाबीन, कापूस आदी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके अक्षरशः करपून गेली असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्रही थांबलेले नाही. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्याची मागणी
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने संभाजीनगर येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्याच्या शासनाच्या आश्वासनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मराठवाड्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे, उद्योगधंद्यांना चालना देणे, मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मार्गी लावणे, प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करणे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील औद्योगिक केंद्र सक्षम करणे, उमरगा-लोहारा तालुक्यातील ३७ भूकंपग्रस्त गावांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देणे, निम्न तेरणा प्रकल्पातील माकणी धरणाचे दोन्ही कालवे दुरुस्त करून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे तसेच कोळसूर ते तुरोरी जोड कालवा बांधणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या विविध प्रश्नांवर विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे आमदार स्वामी यांनी सांगितले.
शेतकरी, युवकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन
‘‘कालचे ‘तुमसे ना हो पायेगा’ हे आंदोलन केवळ एका पक्षाचे आंदोलन नव्हते. ते संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी, बेरोजगार युवकांसाठी आणि विकासकामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधणे हा आंदोलनाचा मुख्य उद्देश होता. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपेक्षा या जनआंदोलनाला उपस्थित राहणे मी महत्त्वाचे मानले,’’ असे आमदार प्रवीण स्वामी यांनी स्पष्ट केले.