धाराशिव

लोहाऱ्यात ‘भावी नगराध्यक्ष चषक’ क्रिकेट महोत्सवाला जल्लोषात प्रारंभ

हायस्कूल मैदानावर तालुकाभरातील १६ संघ आमनेसामने ; लाखो रुपयांच्या बक्षिसांनी खेळाडूंमध्ये उत्साह

लोहारा (जि.धाराशिव) : शहरातील हायस्कूल लोहारा येथील मैदानावर रविवार, दि. १० मेपासून भव्य तालुकास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचा जल्लोषात शुभारंभ झाला. ‘भावी नगराध्यक्ष चषक पर्व-०१ – २०२६’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे संपूर्ण तालुक्यात क्रिकेटचा उत्साह संचारला असून ग्रामीण आणि शहरी भागातील १६ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत मैदान गाजविण्यास सुरुवात केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

पाच दिवस चालणाऱ्या या क्रिकेट महोत्सवाचे उद्घाटन उपनगराध्यक्ष अमीन चाचा सुंबेकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. उद्घाटनावेळी मैदानावर क्रिकेटप्रेमी, युवक व नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी आयोजक व स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ नगरसेवक गौस मोमीन, शिवसेना शहरध्यक्ष श्रीकांत भरारे, सामाजिक कार्यकर्ते ओम पाटील, मोहीन सय्यद, गुड्डू उर्फ बाबा मिस्त्री तसेच युवा उद्योजक ईश्वर बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

तालुक्यातील युवकांना व्यासपीठ मिळावे, ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धेतील प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा होत असून रात्री उशिरापर्यंत प्रेक्षकांची मैदानावर गर्दी होत आहे.

या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे जाहीर करण्यात आलेली भरघोस रोख बक्षिसे. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला अमीन यासीन सुंबेकर यांच्यातर्फे तब्बल ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी महमद महेबुब फकीर यांच्यातर्फे ३१ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी कै. राम भरारे यांच्या स्मरणार्थ २१ हजार रुपये तर चौथ्या क्रमांकासाठी आर.सी. कन्स्ट्रक्शन उर्फ गुड्डू मिस्त्री यांच्यातर्फे ११ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

याशिवाय उत्कृष्ट खेळाडूंनाही विशेष गौरव करण्यात येणार आहे. ‘मॅन ऑफ द सिरीज’साठी ३ हजार १०० रुपये व आकर्षक बॅट, ‘बेस्ट बॉलर’ आणि ‘बेस्ट बॅट्समन’साठी स्पोर्ट्स शूज व बॅट तसेच ‘फायनल मॅन ऑफ द मॅच’साठी २ हजार १०० रुपयांचे विशेष पारितोषिक ठेवण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये अधिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नगरसेवक गौस मोमीन यांच्यासह संतोष वाघमारे, अशपाक शेख, चांद शेख, ऋषिकेश बंगले, मैनू मोमीन आदींसह अनेक युवक व क्रिकेटप्रेमी दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत. मैदानाची सजावट, प्रकाश व्यवस्था, खेळाडूंसाठी सुविधा आणि प्रेक्षकांसाठी करण्यात आलेली व्यवस्था यामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढली आहे.

तालुक्यातील क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा म्हणजे एक प्रकारचा क्रिकेट महोत्सव ठरत असून आगामी काही दिवस लोहाऱ्यात क्रिकेटचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!