लोहारा : लोहारा (खुर्द) येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य सौ. पुष्पा दादासाहेब पाटील यांनी तहसीलदार कार्यालयास निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, लोहारा (खुर्द) गावातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठा पाइपलाईनच्या कामामुळे गावातील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. तसेच माकणी-लोहारा रोडलगत सुरू असलेल्या रस्ते व गटारीच्या कामादरम्यान पाइपलाईनचे नुकसान झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
या कामांमुळे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत सेवालाल महाराज यांच्या पुतळ्यांच्या बांधकामालाही अडथळे निर्माण झाले आहेत. याशिवाय परिसरातील शेतकरी, प्लॉटधारक व नागरिकांना पाण्याअभावी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, संबंधित कामे महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSIDC) अंतर्गत सुरू असून, कंत्राटदारांकडून समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे कामे योग्य नियोजनाशिवाय सुरू असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
तहसीलदारांनी याबाबत तातडीने लक्ष घालून ग्रामसभा घेऊन सर्व संबंधित विभाग, कंत्राटदार व ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधावा, तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती,ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच संबंधित इतर अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.