लोहारा ( जि. धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील नागराळ (लो) येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत उभारण्यात येत असलेला ११ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून लवकरच तो कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर लोहारा उपकेंद्र (सबस्टेशन) अंतर्गत येणाऱ्या शहर व ग्रामीण भागातील ग्राहकांसह विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या बहुतांश शेतकऱ्यांना सिंचनासाठी रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध होत असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी रात्रभर शेतात थांबावे लागते. या परिस्थितीत नागराळ येथे उभारण्यात येणारा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये या प्रकल्पाबाबत आशावादी वातावरण निर्माण झाले आहे.
सौर ऊर्जेवर आधारित हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून भविष्यातील वीज तुटवडा टाळण्यासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज थेट कृषी वाहिनीद्वारे शेतकऱ्यांना पुरवठा केली जाणार असल्याने कृषी पंपांसाठी दिवसा स्थिर व विश्वासार्ह वीज उपलब्ध होईल. त्यामुळे पिकांचे सिंचन वेळेत होऊन शेती उत्पादनात वाढ होण्यासही मदत होणार आहे.
दरम्यान, परिसरातील काही व्यक्ती शेतकऱ्यांची दिशाभूल करून चुकीची माहिती पसरवत असल्याचेही समोर येत आहे. अवांतर मोबदला मिळविण्याच्या उद्देशाने काही जणांकडून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे. अशा प्रकारांमुळे प्रकल्पाच्या कामात अनावश्यक अडथळे निर्माण होत असल्याचेही बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, तसेच विनाकारण अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
नागराळ येथे उभारला जाणारा हा ११ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर लोहारा परिसरातील वीजपुरवठा व्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल होणार असून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाल्याने शेती व्यवस्थापन अधिक सोयीचे होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लोहारा तालुक्याच्या कृषी विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.