धाराशिव – शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे शेतकरी नेते जगदिश पाटील यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये प्रवेश केला. मुंबईतील मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले. या वेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील उपस्थित होते.
पाटील यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेचे पारडे जड होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रासह शेतकरी चळवळीतील सक्रिय सहभागामुळे त्यांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथील रहिवासी असलेले जगदिश पाटील हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कोषाध्यक्ष होते. मात्र, पक्षातील फुटीमुळे त्यांनी नाराजी व्यक्त करून एक वर्षांपूर्वीच पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी छाप सोडली.
आता त्यांच्या प्रवेशामुळे केशेगाव, बेंबळी, कानेगाव आणि लोहारा परिसरात शिवसेनेला नवे बळ मिळणार असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात मानले जात आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी जिल्ह्यात सेनेची पकड मजबूत करण्यासाठी घेतलेली आघाडी अधिक दृढ झाली आहे.
या प्रवेशावेळी जगदिश पाटील यांच्यासोबत गोविंद गरड, विक्रम भोसले, बाळासाहेब पाटील, खंडू शिंदे, दत्ता चव्हाण-पाटील, नेताजी गायकवाड, अश्विन पाटील, सुभाष कळसुले, बालाजी सगट, मुकेश पाटील, महादेव ढोले, चंदू ताकमोगे, सुधीर गायकवाड, पल्लव पाटील, धनराज कुंभार, निखिल वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
Back to top button
error: Content is protected !!