धाराशिवराजकीय

सास्तूरमध्ये प्रचाराला उधाण; खा. ओमराजे निंबाळकरांच्या सभेने राजकीय वातावरण तापले

सास्तूर (ता. लोहारा) : सास्तूर जिल्हा परिषद गटातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. सागरबाई अशोक सावळकर यांच्या प्रचारार्थ सास्तूर येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


सभेच्या सुरुवातीपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण होते. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. खासदार ओमराजे निंबाळकर सभास्थळी दाखल होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

आपल्या भाषणात खासदार निंबाळकर यांनी राज्य व केंद्रातील सध्याच्या धोरणांवर टीका करत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील विकास, शेतकरी, युवक आणि महिलांच्या प्रश्नांसाठी लोकप्रतिनिधींनी सातत्याने आवाज उठवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही मूल्ये जपण्यासाठी सजग राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी उमेदवार सौ. सागरबाई सावळकर यांनी सास्तूर गटातील स्थानिक प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली. पाणीटंचाई, खराब रस्ते, आरोग्य सुविधा, महिला बचतगटांचे बळकटीकरण आणि मूलभूत सोयीसुविधा या विषयांवर ठोस काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. विकास हा केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

सास्तूर गटात परिवर्तनाची लाट

उमेदवार सौ. सागरबाई सावळकर यांनी आपल्या भाषणातून मतदारसंघातील प्रश्नांवर थेट बोट ठेवले. विकासाच्या नुसत्या गप्पा मारणाऱ्यांना आता कृतीतून उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

या जाहीर सभेसाठी धाराशिवचे खासदार मा. श्री. ओमराजे निंबाळकर, आमदार मा. श्री. प्रविण स्वामी, माजी नगरपरिषद अध्यक्ष (उमरगा) मा. श्री. अब्दुल सत्तार, जिल्हा संघटक ॲड. दिपक भैय्या जवळगे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख मा. श्री. अमोल बिराजदार यांच्यासह आदी मान्यवरांसह, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्ते आणि सास्तूर गटातील नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या या प्रचंड प्रतिसादामुळे सास्तूर गटात शिवसेनेच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

सभेतील उपस्थिती आणि प्रतिसादामुळे सास्तूर गटातील निवडणूक प्रचार अधिक वेग घेत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सास्तूर गटात येत्या काही दिवसांत प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, विविध पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!