लोहारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या सत्ताधारी नेत्यांच्या मक्तेदारीसाठी नसून, निष्ठेने व प्रामाणिकपणे राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या हक्काच्या आहेत, असे ठाम प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
तालुक्यातील सास्तूर येथे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सभेच्या प्रारंभी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सुजात आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने सर्व समाजघटकांना सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वसमावेशक उमेदवारी दिली आहे. गेल्या ३५ वर्षांपासून अकोला जिल्हा परिषदेत वंचितची सत्ता असताना प्रत्येक गावात आरोग्य केंद्रे सुरू झाली, जिल्हा परिषद शाळांची संख्या वाढली आणि शिक्षणाचा भक्कम पाया घातला गेला.
मात्र, सध्याचे सत्ताधारी जिल्हा परिषद शाळा बंद करत असून सर्वसामान्यांच्या शिक्षणावर घाला घालत आहेत. महागड्या खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणे सामान्य कुटुंबांना परवडणारे राहिलेले नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
HTML img Tag

त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनतेचे खरे प्रश्न मांडणाऱ्या आणि समाजाच्या प्रत्येक घटकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या वेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. नितीन ढेपे, जिल्हा निरीक्षक रमेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष रवीकिरण बनसोडे, उमरगा तालुकाध्यक्ष राम गायकवाड, लोहारा तालुकाध्यक्ष नितीन सीतापुरे, मेजर विष्णू वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. सुखदेव होळीकर यांनी केले. याप्रसंगी अपक्ष उमेदवार अंजलीतई सरवदे यांनी वंचितच्या उमेदवारी लक्ष्मीबाई बनसोडे यांना जाहीर पाठींबा दिला आहे. यावेळी सुजात आंबेडकर यांनी त्यांचा सत्कार केला.
Back to top button
error: Content is protected !!