लोहारा : लोहारा तालुक्यातील जेवळी जिल्हा परिषद गटात सध्या राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गटातून सौ. प्राणली राजेंद्र पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी ठाम व जोरदार मागणी नागरिकांतून पुढे येत असून, ‘हक्काचं नेतृत्व’ मिळण्याची अपेक्षा आता उघडपणे व्यक्त केली जात आहे.
भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र अमृतराव पाटील यांच्या आतापर्यंतच्या कार्यपद्धतीचा, जनतेशी असलेल्या थेट संपर्काचा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचा प्रभाव जेवळी गटात स्पष्टपणे दिसून येतो. याच पार्श्वभूमीवर सौ. प्राणली पाटील यांचे नाव पुढे येत असून, अभ्यासू, संयमी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
शिक्षण, कृषी, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आदी मूलभूत प्रश्नांवर त्यांची नेमकी भूमिका, तसेच शासन व जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा यासाठी असलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा नागरिकांना भावत आहे. निधीचा योग्य वापर, कामांची गुणवत्ता आणि वेळेत अंमलबजावणी यावर असलेला ठाम भर ही त्यांच्या कार्यशैलीची ओळख बनत आहे.
दरम्यान, भाजपच्या जिल्ह्यातील नेते व पक्षश्रेष्ठींच्या विश्वासू वर्तुळात ओळख असलेले राजेंद्र पाटील यांनी जेवळी गटात कार्यकर्त्यांसह गाठीभेटी घेतल्या. थेट संवादातून नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेत असताना, अनेकांनी एकमुखाने “जेवळी गटातून हक्काचं नेतृत्व द्या” अशी स्पष्ट भूमिका मांडली.
या सकारात्मक आणि तत्पर भूमिकेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेत मिसळून काम करणारे, प्रश्न ऐकून घेणारे आणि उपायांसाठी पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून सौ. प्राणली पाटील यांच्याविषयीचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्याचे चित्र सध्या जेवळी गटात दिसत आहे.
आता या मागणीला राजकीय पातळीवर काय दिशा मिळते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.