लोहारा प्रतिनिधी :
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेला हायमास्ट लॅम्पचा पोल काही महिन्यांपूर्वी अपघातामुळे पडला होता. मात्र अद्याप तो पुन्हा बसवण्यात न आल्याने संपूर्ण चौक अंधारात आहे. या अंधारामुळे नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला असून कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या चौक परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. मात्र प्रकाशव्यवस्था नसल्याने भाविक व वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत नगर पंचायत प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात नागरिकांनी मा. मुख्याधिकारी, नगर पंचायत कार्यालय लोहारा यांना निवेदन देत पुढील दोन दिवसांत हायमास्ट पोल दुरुस्त करून बसवण्यात यावा, अशी स्पष्ट मागणी केली आहे. दोन दिवसांत पोल बसवण्यात न आल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर उत्तरेश्वर राम उपरे, दिगंबर दत्तात्रय भिंगे, नगरसेवक प्रशांत काळे, प्रवीण गणेश कदम, अमर विनायक काडगाळे, कुंभार प्रवीण बालाजी, कुरुशन बलभीम विरुद्धे, अक्षय माटे, सचिन माळी, प्रकाश होंडराव, महेश चपळे, शेखर पाटील, मल्लिनाथ फावडे, किशोर भालेराव, प्रतिक भरारे, जीवन कदम, विशाल जेट, दयानंद मोहन स्वामी, प्रशांत बालाजी रेणके, न्यानेश्वर काडगाळे, राठोड धोंडीराम व योगेश गरड यांच्या सह्या आहेत.
नगर पंचायत प्रशासन या मागणीची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करणार का, याकडे लोहारा शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.