लोहारा (ता. लोहारा) : लातूर येथील गंभीर प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अन्यथा भारतीय बहुजन पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा भारतीय बहुजन पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन लोहारा तालुका तहसीलदार एस. सी. अहिरे यांना देण्यात आले.
निवेदनात संबंधित प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी ठाम मागणी पक्षाने केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास भारतीय बहुजन पक्ष आंदोलनाचा मार्ग अवलंबेल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
यावेळी भारतीय बहुजन पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये लोहारा तालुका अध्यक्ष पंडू खंडाळे, धाराशिव जिल्हा संघटक संजय खंडाळे, धाराशिव सचिव विजय रोडगे, धाराशिव महिला संघटक शोभा मस्के, धाराशिव जिल्हाध्यक्ष बळीराम रोडगे, सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ पात्रे, तसेच अक्कलकोट तालुका महिला संघटक रेश्मा पात्रे यांचा समावेश होता. तहसीलदार अहिरे यांनी निवेदन स्वीकारून ते वरिष्ठांकडे पाठवून योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.