लोहारा : मार्डी (ता. लोहारा) — “बालपण म्हणजे फुललेले स्वप्न… आणि शिक्षण म्हणजे त्या स्वप्नांना पूर्ण होण्याचा श्वास!” — अशा भारदस्त वातावरणात आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मार्डी येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळीच शाळा रंगीबेरंगी फुलांनी सजली होती. मुलांच्या डोळ्यांत कुतूहल, चेहऱ्यावर हसू आणि वातावरणात बालदिनाची ऊर्जा ओसंडून वाहत होती. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश वाघमोडे सर यांच्या हस्ते नेहरूजींच्या प्रतिमेचे पूजन होताच कार्यक्रमाची सुरुवात एक वेगळाच रंग घेऊन झाली.
यानंतर प्रस्ताविकात श्रीमती महानंदा चव्हाण मॅडम यांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व अगदी समजेल अशा शब्दांत पटवून दिले. “तुमच्या हातातील पुस्तकच उद्याच्या जगाचे दार उघडते,” असा संदेश देताना मुलांचे चेहरे उजळले.
कार्यक्रमात पुढे श्रीमती वर्षा चौधरी मॅडम यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून यशस्वी होण्यासाठी मेहनत, स्वप्न आणि सातत्य किती आवश्यक आहे हे सांगून विद्यार्थ्यांना जणू नवचैतन्य दिले.
शाळेतील उपक्रमशील शिक्षक रमाकांत खटके सर यांनी पहिलीतील विद्यार्थ्यांना बालपुस्तकांचे वाटप करून लहानग्यांच्या हातात ज्ञानाची किल्लीच ठेवली. पुस्तक मिळताच मुलांच्या डोळ्यांतील चमक हीच या उपक्रमाचे यश सांगत होती.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सुरेश वाघमोडे सर यांनी विद्यार्थ्यांना “कष्टाचा मंत्र” देत प्रेरित केले.
त्यांनी सांगितले, “कष्टाशिवाय यश नाही… आणि यशाशिवाय शिक्षणाची खरी मजा नाही!”
प्रमुख अतिथी म्हणून मार्डी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती श्री. श्रीमंत अशोक पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. माणिक शेट्टी सर यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, शालेय समितीचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, तसेच तज्ञ शिक्षक श्री. योगेश देवकर यांसह सर्व मान्यवर उपस्थित होते.
बालदिनाची ही रंगतदार सोहळा संपला… पण मुलांच्या मनात पेरलेली स्वप्नं मात्र आता उगवायला सज्ज झाली आहेत!