धाराशिवमहाराष्ट्र

“आंदोलनाचा एकच आवाज… आणि शासन हलले! अनुदान खात्यावर; रस्ता रोको रद्द – शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास”

लोहारा ( जि. धाराशिव ) : कधी कधी एका आंदोलनाचा आवाज संपूर्ण राज्याच्या कानापर्यंत पोहोचतो… आणि शासनालाही जाग येते!
लोहारा तहसील कार्यालयासमोर ७ नोव्हेंबर रोजी झालेलं धरणे आंदोलन असंच ठरलं. शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखालील हा लढा नेमका कुठे थांबणार…? हे पाहण्यासाठी संपूर्ण तालुक्याचे डोळे त्या आंदोलनाकडे खिळले होते.

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अनेक महिन्यांपासूनची तीच चिंता––
“अतिवृष्टीचं अनुदान कधी येणार?”
“केवायसी केव्हा सुरू होणार?”

प्रशासन शांत… पोर्टल बंद… आणि शेतकऱ्यांचा संयम संपत चाललेला.

अनुदान मंजूर… पण खात्यावर?

लोहारा–उमरगा तालुक्यातील तब्बल ७९,८८० शेतकऱ्यांसाठी ८६ कोटी ४६ लाख ३४ हजारांची मदत मंजूर झाली होती.
मात्र वितरणाची गती इतकी संथ की, शेतकरी म्हणू लागले—
“मंजुरी कागदावर, पण आम्ही तरी कधी पाहणार पैशे?”

त्यातच १ ऑक्टोबरपासून ई-केवायसी पोर्टल बंद झालं.
लोहारा–उमरगा तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण झाली.

७ नोव्हेंबर—तालुक्याचा श्वास एकवटलेला!

त्या दिवशी लोहारा तहसील कार्यालयासमोर हजारो शेतकरी जमा झाले.
जणू सगळ्यांनी मनातल्या मनात एकच शपथ घेतली होती—
“या वेळेला न्याय मिळेपर्यंत शांत बसायचं नाही!”

अनिल जगताप यांनी शासनाला थेट इशारा दिला—
“१६ नोव्हेंबरपर्यंत केवायसी सुरू करा, अनुदान जमा करा…
नाहीतर १७ नोव्हेंबरला आष्टा मोड येथे रस्ता रोको!”

आणि या इशाऱ्याचा आवाज फक्त लोहाऱ्यात नाही… तर मंत्रालयापर्यंत पोहोचला.
खासदार, आमदार, स्थानिक नेते—सगळ्यांचे लक्ष आंदोलनाकडे वळले.
आमदार प्रवीण स्वामी यांनीही स्वतः रस्ता रोकोमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली.
आता तालुक्यात एकच चर्चा—
“सरकार हलणार का… की लढा आणखी तीव्र होणार?”

१२ नोव्हेंबरची संध्याकाळ – शेतकऱ्यांच्या डोळ्यात चमक परतली!

एकाएकी काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर संदेश येऊ लागले—
“आपल्या खात्यावर अतिवृष्टी अनुदान जमा केले आहे.”
पहिल्यांदा कुणी विश्वास ठेवला नाही… पण थोड्या वेळात दुसऱ्याचा, तिसऱ्याचा, चौथ्याचा संदेश…!

लोक एकमेकांना दाखवू लागले—
“हे बघ, आले पैसे!”
कोंडमारा फोडल्यासारखे आनंदाचे वातावरण!

याच वेळी मोठी बातमी—
१३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ई-केवायसी पोर्टल सुरू!
जे पोर्टल महिनाभर बंद होतं… ते आंदोलनानंतर एका दिवसात सुरू!

आंदोलनाचा दणका – शासनाचा तत्पर प्रतिसाद

सरकार हलले होते… हे आता स्पष्ट झाले.

२४ व २५च्या अनुदानाचे पैसे तालुक्यात वेगाने जमा होताच,
शेतकरी नेते अनिल जगताप यांनी जाहीर केले.

“१७ नोव्हेंबरचे रस्ता रोको आंदोलन रद्द!”

लोहारा–उमरग्याने पेटवलेली ठिणगी महाराष्ट्रभर पोहोचली** या एका आंदोलनाचा फायदा फक्त दोन तालुक्यांनाच नव्हे… तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झाला. केवायसी पोर्टल सुरू झाल्यामुळे सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या संघर्षाची राज्यभर प्रशंसा होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!