लोहारा (प्रतिनिधी) जि. धराशिव : – “शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई आता थांबणार नाही, भातागळी होणार नवी दिशा दाखवणारा टप्पा!” — अशा घोषणांनी 11 नोव्हेंबरच्या सायंकाळी भातागळी गाव गजबजणार आहे. तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथील या छोट्याशा गावात यंदा शेतकऱ्यांच्या मनातील वेदना आणि आशा एकत्र गुंफल्या जाणार आहेत. कारण या दिवशी सायंकाळी सहा वाजता होणार आहे भव्य शेतकरी मेळावा — आणि त्यात मार्गदर्शन करणार आहेत अहिल्यानगरचे लोकप्रिय खासदार निलेश लंके!
हा मेळावा केवळ भाषणांचा नव्हे, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार मांडणारा ठरणार आहे. शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या पुढाकाराने आणि महाविकास आघाडी लोहारा-उमरगा यांच्या सहकार्याने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्यासपीठावरून शासनाला शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या पुन्हा एकदा ठामपणे मांडल्या जाणार आहेत —
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तातडीने व्हावी,
माकणी धरणाची उंची वाढ रद्द करावी,
एक रुपयात पीक विमा योजना पुन्हा लागू करावी,
अतिवृष्टी अनुदानाची मर्यादा व रक्कम वाढवावी,
आणि सर्वात महत्त्वाचं — सोयाबीनला प्रति क्विंटल सात हजार रुपयांचा भाव मिळावा!
शेतकऱ्यांच्या या लढ्यात खासदार निलेश लंके यांच्यासह बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे, आमदार कैलासदादा पाटील, आमदार प्रवीण स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणाताई सलगर, जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील, माजी उपाध्यक्ष बाबा पाटील आणि अनेक मान्यवर हजेरी लावणार आहेत.
गावातील प्रत्येक रस्त्यावर बॅनर, पोस्टर आणि घोषवाक्यांनी आधीच मेळाव्याचा उत्साह चढलेला आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, “भातागळीतील शेतकऱ्यांचा आवाज आता शासनापर्यंत पोहोचल्याशिवाय थांबणार नाही!”
शेतकरी बांधवांसाठी ग्रामस्थांच्या वतीने स्वादिष्ट भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मिळून हा कार्यक्रम अविस्मरणीय व्हावा म्हणून झटत आहेत.
भातागळीमध्ये 11 नोव्हेंबरची संध्याकाळ शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ‘क्रांतीचा रणशिंग फुंकणारी’ ठरणार आहे —
“शेतकऱ्याच्या न्यायासाठी, एकजुटीने पुढे चला!”