लोहारा (जि. धाराशिव) (प्रतिनिधी) : मातृभूमीचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे प्रथम कर्तव्य आहे, हा मोलाचा संदेश देत महाराष्ट्र पोलिस मित्र सोशल असोसिएशनच्या वतीने आयोजित “गौरव कर्तव्याचा – सत्कार समाजसेवकांचा” हा राज्यस्तरीय सोहळा आज (दि. १९ ऑक्टोबर २०२५) लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक येथे उत्साहात संपन्न झाला.
या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत अॅड. अण्णाराव पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून लातूरचे खासदार मा. डॉ. शिवाजीराव काळगे, ज्येष्ठ लेखक व विचारवंत नागोराव कुंभार, ह.भ.प. महादेव महाराज अर्सुळ, व्हॉईस ऑफ मिडियाचे पत्रकार राजेंद्र बारगुले आणि कार्यक्रमाचे संयोजक सुफी सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्रातील आरोग्य, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० समाजसेवकांचा शाल, पुष्पगुच्छ, आकर्षक सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
त्यामध्ये लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक श्री. नितीन गोरोबा वाघमारे यांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक” म्हणून आणि शेतकरी, महिला व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. रंजनाताई श्रीकांत हासुरे यांना “आदर्श समाजसेविका” म्हणून खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सत्कारमूर्तींना त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवाराने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी सकाळचे पत्रकार निळकंठ भाऊ कांबळे, प्राचार्य शहाजी जाधव, भीमाशंकर डोकडे, रोहित गायकवाड, श्रीकांत हासुरे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी पत्रकार निळकंठ कांबळे, प्राचार्य शहाजी जाधव, शिक्षक संघटनेचे लोहारा तालुकाध्यक्ष भिमाशंकर डोकडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र पोलिस मित्र सोशल असोसिएशनचे अभिनंदन सर्वत्र व्यक्त केले जात आहे.